

'मम्मी, अमेय खोटारडा आहे. त्याने आपल्याला फसवलं. मला एकही क्षण त्याच्यासोबत नाही रहायचं."अगं मीना, असं काय बोलतेस? तुमचं काही भांडण झालंय का?'नाही मम्मी, आपण फसलो. मला त्याच्यासोबत नाही रहायचं. मी घरी येतेय.'असं म्हणून मीनाने आपला फोन बंद केला. तशी मीनाच्या आईची धाकधूक वाढली. तिने लागलीच घरात सगळ्यांना फोनची कल्पना दिली.
अमेय सोंगटे आणि मीना बांदेकर. दोघांची एका मॅट्रिमोनी साईटवर ओळख झाली. मुलगा एमटेक, अमेरिकेत शास्त्रज्ञ म्हणून नोकरीला. रंगाने सावळा. अस्खलीत इंग्रजी बोलायचा. समोरच्यावर छाप पाडणारे वक्तृत्व. लग्नासाठी मायदेशी आलेला. मीना बीटेक, बंगळूरूला चांगल्या पगारावर जॉबला. अमेयची घरची परिस्थिीती बेताची तर ती सुखवस्तू कुटुंबातली. कमी बोलणारी. अमेयचा स्वभाव हवावहवासा वाटणारा, मितभाषी. शिक्षण आणि पगार सोडला तर कुठेही बरोबरी होणारी नव्हती. पण एका मॅट्रिमोनी साईटवर दोघांची ओळख झाली होती. बयोडेटा वाचूनच तिला त्याचं आकर्षण वाटलं. लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधतात, असं म्हणतात. त्यामुळे 'ह्योच नवरा पायजे' म्हणत तिनं भेटायची इच्छा व्यक्त केली. चांगल्या हॉटेल मध्ये कॉफीच्या निमित्ताने भेटले. दोघेही उच्चशिक्षित त्यामुळे तेवढी मॅच्युरीटी होतीच. दोघांनीही होकार कळवला. आता घरच्यांच्या वाटाघाटी सुरू झाल्या. त्याचं जवळचे कोणी नव्हते. दुरच्या नात्यातील अंकलनी त्याचा आतापर्यंतच्या शिक्षणाचा खर्च केला होता. त्यामुळे अमेयसाठी तेच सगळे होते.
लेक सासरी म्हणून थेट अमेरिकेला जाणार, घरच्यांनी अमेरिका फक्त नकाशात, फोटोत नाहीतर टिव्हीत बघितलेली, पोरीचं सोनं होतेय म्हंटल्यावर अमेय सांगेल त्यावर त्यांनी डोळे झाकून विश्वास ठेवला. त्याने आपण काम करत असलेली कंपनी, रहात असलेला परिसर व्हिडिओद्वारे दाखवला होता. ती आता त्या नयनरम्य स्वप्नातच रमली होती. मीनाच्या घरच्यांनी झटपट लग्नाला होकार दिला. प्री वेडिंग, रिंग सेरेमनी आटोपून घरच्यांनी मुलीचं लग्न धूमधडाक्यात लावून दिलं. गोव्याला जाऊन हनिमूनही झाला. आणि अमेयला आता परतीचे वेध लागले होते. कारण त्याची रजा संपली होती.
सगळेजण त्याला एअरपोर्टवर पोचवायला आले. सहा महिन्यांनंतर अमेय मीनाला न्यायला परत येणार होता. त्याला सुखरूप निरोप देऊन मीनाही बंगळूरूला आपल्या कंपनीत जॉईन झाली. दरम्यान, तिथे गेल्यावर अमेय बदलल्यासारखा वाटला. जुजबीच बोलायचा. तो आपणहून कधी फोन करायचा नाही. वर्कलोड आहे, बोलतो निवांत ' म्हणून फोन कट करायचा. 'असेल खूप काम' म्हणून तीही मनाची समजूत घालायची. दहा-पंधरा दिवसांनी पैसे मागायचा. 'खर्च खूप झालेत, बचत करतोय, तुझ्यासाठी रहाण्याची व्यवस्था शोधतोय, मोठं सरप्राईझ देणार आहे, ' म्हणून त्याने आतापर्यंत मीनाची साठवलेली सगळी जमापुंजी संपवत आणली होती.
दीड महिना असाच गेला. कोरोनाचा जगभर उद्रेक झाला. मीनासह सगळ्यांना अमेयची काळजी वाटत होती. त्याने 'मी भारतात परत येतोय' म्हणून मीनाला फोन केला आणि दोन दिवसात तो परत आला. तिला जरा विचित्रच वाटलं, पण ती काही बोलली नाही. काही दिवस लॉकडाऊनमध्ये गेले. मग जग सावरू लागलं. मीनाचाही वर्क फ्रॉम होम जॉब सूरू होता. अमेयने मात्र कंपनी सुरू झाली की लगेच परत बोलवतील. तेव्हा बरोबर जाऊ, असं सांगून टाकलं होतं. लॉकडाऊन संपून हळूहळू सगळे सुरू झालं. पण अमेय काहीही हालचाल करेना. दिवसभर मोबाईल आणि लॅपटॉपवरच असायचा. प्रोजेक्ट सुरू आहे, मिटिंग सुरू आहे, असे काहीतरी सांगायचा. जॉब विषयी विचारले की थातूरमातूर उत्तरे द्यायचा.
आता मीनाला शंका येऊ लागली. अमेय मीनाला त्याच्या मोबाईल किंवा लॅपटॉपला अजिबात हात लावू द्यायचा नाही. उशिरापर्यंत बाल्कनीत बोलत बसायचा. विचारले तर सरळ काही सांगायचा नाही. मग तिने घरात अमेयच्या अनुपस्थित एक छुपा कॅमेरा लपवून ठेवला. तिला जाणून घ्यायचं होतं की हा दिवसभर नक्की करतो काय? एके दिवशी अमेयचं पोट खूप बिघडलं. त्याला बरं वाटत नव्हतं. औषध घेऊन तो डाराडूर झोपला होता. मीनालाही आज विकेंड होता. सहज तिची नजर त्याच्या फोनवर पडली. अमेय फोन लॉक करायला विसरला होता. मीनाने फोन तपासला. तिला आता वेड लागायचं बाकी होतं. ती मटकन खाली बसली. तिने त्यातही स्वत:ला सावरत त्याचा डाटा आपल्या मोबाईलवर शेअर करून घेतला.
मग तिने लपवलेला कॅमेरा तपासला आणि तीची आता खात्रीच झाली. तिने त्याच्या मोबाईलवरून त्याची सगळी प्रोफाईल जाणून घेतली आणि ती कोसळली. तिने आपल्या आईला लागलीच फोन लावला. 'मम्मी, मी फसलो. अमेयने माझ्यासारख्या अजून चारजणींचे आयुष्य त्याने बरबाद केलेय. याची चार लग्ने झालीत मम्मी. मला त्याच्यासोबत नाही रहायचं. मी घरी येतेय.'असं म्हणून मीनाने आपला फोन बंद केला. तशी मीनाच्या आईला घाम फूटला. तिने लागलीच घरात सगळ्यांना फोनची कल्पना दिली.
मीना दुपारी बंगळूरूहून घरी आली. घरच्यांना पाहून तिचा हुंदका बाहेर पडला. तिने सगळ्या गोष्टींचा उलगडा केला. अमेय सोंगटे हा भामटा अमेरिकेत कसलाही शास्त्रज्ञ नव्हता. तो दिल्लीत रहायचा. बनावट आयडीवरून आपण अविवाहित असल्याचे भासवून सावज शोधायचा. सापडले की त्यांची लूट करून दुसरे सावज शोधायचा. आत्तापर्यंत त्याने अशाच चार ठिकाणी तरूणींना फसवून आपल्या जाळ्यात ओढून संसार थाटला होता. पण हतबलतेमुळे आणि पुराव्या अभावी त्या अमेयविरूद्ध गुन्हा दाखल करू शकल्या नव्हत्या. पण मीनाच्या धाडसामुळे अमेय कचाट्यात अडकला. मीनाने घरच्यांसोबत जाऊन जवळच्याच पोलिस ठाण्यात फसवणुकीची केस दाखल केली. वरिष्ठ अधिकार्यांनी लागलीच तत्परता दाखवत ती अमेय रहात असलेल्या अणि फसवणूक झालेल्या इतर पोलिस ठाण्यात पाठवली.
त्याला लैंगिक छळ, बलात्कार, फसवणूक अशा विविध गुन्ह्यांखाली अटक होऊन जेलची हवा खावी लागली. हीच तत्परता लग्नाआधी मीना आणि मीनाच्या घरच्यांनी विवाहाच्या स्थळाची माहिती घेताना शहानिशा करून दाखवली असती तर आता मीना आणि इतरजणींना पश्चातापाची वेळ आली नसती.