दुर्दैवी ! अखेर ‘त्या’ बेपत्ता युवकाचा सापडला मृतदेह | पुढारी

दुर्दैवी ! अखेर 'त्या' बेपत्ता युवकाचा सापडला मृतदेह

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : खडकवासला-कोल्हेवाडी येथील बेपत्ता युवकाचा मृतदेह पानशेतजवळील कादवे खिंडीत बुधवारी (दि.13) रात्री जळालेल्या अवस्थेत सापडला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. तन्मय किरण तांबडे (वय 24, रा. सुशीला पार्क, कोल्हेवाडी, खडकवासला) असे मृत युवकाचे नाव आहे. तो मुळचा कोल्हापूर येथील राहणारा आहे. तन्मय याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मृतदेहाच्या शवविच्छेदनाच्या अहवाल मिळाल्यानंतर मृत्युचे कारण समजू शकेल असे वेल्हे पोलिसांनी सांगितले. दरम्यान तन्मय याने आत्महत्या केली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

शनिवारी (दि. 9 मार्च ) तन्मय हा कामावर जातो असे सांगून घरातून गेला. त्यानंतर तो परत घरी आला नाही. नातेवाईकांनी हवेली पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या देखरेखीखाली पोलिस हवालदार विलास प्रधान तन्मय याचा शोध घेत होते. सोमवारी (दि. 11) तन्मय याची दुचाकी गाडी पानशेत-वेल्हे घाट रस्त्यावरील दुर्गम कादवे खिंडीत सापडली. काल रात्री पोलिस अंमलदार विलास प्रधान, आपत्ती व्यवस्थापनचे तानाजी भोसले, गणेश सपकाळ, संजय चोरघे, संदीप सोलस्कर, वैभव निकाळजे, गणेश पांढरे, राहुल पवळे आदींनी पुन्हा शोध मोहीम सुरू केली असता जळालेल्या अवस्थेत तन्मय याचा मृतदेह सापडला.

हेही वाचा

Back to top button