उकाड्यामुळे खरबूज, पपई खातेय भाव; रसदार फळांकडे नागरिकांचा कल | पुढारी

उकाड्यामुळे खरबूज, पपई खातेय भाव; रसदार फळांकडे नागरिकांचा कल

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरू झाल्याने इफ्तारसाठी बाजारात कलिंगड, खरबूज, पपईला मागणी वाढली आहे. त्याअनुषंगाने बाजारात या फळांची आवक देखील वाढली आहे. उन्हाचा चटकाही वाढल्याने बाजारात दाखल होत असलेल्या मालाच्या तुलनेत या फळांना मागणी जास्त आहे. परिणामी, या फळांच्या भावात दहा ते पंचवीस टक्क्यांनी वाढ झाली आहे.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केटयार्डात रमजानच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी फळांची मोठ्या प्रमाणात आवक होते. याकाळात, कलिंगड, खरबूज, पपई आदी फळांची आवक दुपटीने वाढते. सध्यस्थितीत बाजारात सोलापूर, अहमदनगर, सातारा तसेच पुणे जिल्हयातून फळे बाजारात दाखल होत आहेत. कलिंगडामध्ये सिंम्बा, शुगरक्विन, मेलोडी, नामधारी, सीडलेस खरबूजामध्ये लायरपूर, कुंदन आदी वाणांची फळे येत आहे.

बाजारात कलिंगड, खरबूज, पपई आदी रसदार फळांना चांगली मागणी आहे. रमजान सुरू झाल्यानंतर घरगुती स्वरुपात छोट्या फळांना मागणी अधिक आहे. मालाच्या तुलनेत आवक कमी असल्याने या फळांच्या भावात वाढ झाली आहे.

– पांडुरंग सुपेकर, कलिंगड व खरबुज व्यापारी, मार्केट यार्ड.

रसदार फळांना मागणी

रोजा सोडताना सर्वसाधारणपणे जड पदार्थ न खाता ज्यात पाण्याचे प्रमाण जास्त आहे ती फळे खाण्याची एक पध्दत प्रचलित आहे. रोजा सोडते कलिंगड, खरबूज या पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या फळांना जास्त प्राधान्य दिले जाते. याखेरीज, केळी, पपई, डाळिंब, अननस या फळांचाही समावेश असतो.

हेही वाचा

Back to top button