आजी-आजोबांचीही रविवारी होणार परीक्षा! | पुढारी

आजी-आजोबांचीही रविवारी होणार परीक्षा!

पुणे : पुढारी वृत्तसेवा : केंद्र शासनपुरस्कृत नवभारत साक्षरता कार्यक्रमात पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी येत्या रविवारी (दि. 17) महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांत होणार आहे. राज्यात आत्तापर्यंत सहा लाख 20 हजार इतक्या असाक्षरांची ऑनलाईन नोंदणी केंद्र शासनाकडे झाली आहे. त्या सर्वांची परीक्षा घेण्याची प्रशासनाने तयारी केली आहे. दरम्यान, 5 लाखांहून अधिक असाक्षर ही परीक्षा देतील, असा अंदाज आहे. सध्या दहावी-बारावीच्या परीक्षांसह इतरही विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे नातवंडांसह आजी-आजोबाही अभ्यासात सध्या मग्न आहेत.

देशातील 15 वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील निरक्षर व्यक्तींमध्ये पायाभूत साक्षरता (वाचन, लेखन) व संख्याज्ञान विकसित करून देशातील 15 वर्षे आणि त्यावरील वयोगटातील असाक्षर व्यक्तींना महत्त्वपूर्ण जीवनकौशल्ये विकसित करावयाची आहेत. या कौशल्यांमध्ये आर्थिक साक्षरता, कायदेविषयक साक्षरता, डिजिटल साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन कौशल्य, आरोग्याची काळजी व जागरूकता, बालसंगोपन आणि शिक्षण, कुटुंबकल्याण आदी बाबींचा समावेश आहे. असाक्षरांची पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी रविवारी (दि. 17) ऑफलाईन पद्धतीने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये घेण्यात येणार आहे. केंद्राचे निरीक्षक अवर सचिव प्रदीप हेडाऊ 16 ते 18 मार्च या कालावधीत महाराष्ट्र दौर्‍यावर आहेत. शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारीही प्रत्येक जिल्ह्यासाठी निरीक्षक म्हणून नेमण्यात येणार आहेत.

परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र

परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर असाक्षरांना केंद्र शासनाकडून प्रमाणपत्र/ गुणपत्रक देण्यात येणार आहे. या परीक्षेच्या माध्यामातून व्यक्तींमध्ये विविध कौशल्ये विकसित होतील. वेगवेगळ्या दुकानांमध्ये वस्तूंची खरेदी करण्यासाठी गेले असता फसवणूक होणार नाही. बँक/पोस्ट ऑफिस इ. ठिकाणी आर्थिक व्यवहारामध्ये फसवणूक होणार नाही.

असाक्षर व्यक्तींनी निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रांवर येत्या रविवारी न चुकता सकाळी 10 ते सायं. 5 या वेळेत आपल्या सवडीने स्वतःच्या ओळखपत्रासह परीक्षेसाठी उपस्थित राहणे गरजेचे आहे.

– डॉ. महेश पालकर, शिक्षण संचालक, योजना संचालनालय

परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होईल. प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका एकत्रित असेल, मराठी माध्यमातून परीक्षा आयोजित करण्यात येईल. अपवादात्मक परीक्षा केंद्रांवर इतर माध्यमांचे परीक्षार्थी आल्यास त्याबाबतची व्यवस्था जिल्हा शिक्षणाधिकारी (योजना) यांच्याकडून करण्यात येत आहे.

– राजेश क्षीरसागर, उपसंचालक, योजना संचालनालय

हेही वाचा

Back to top button