बीड : अंबाजोगाई पोलीस ठाण्यात मनोज जरांगेसह १३ जणांवर गुन्हा

मनोज जरांगे-पाटील
मनोज जरांगे-पाटील

अंबाजोगाई : पुढारी वृत्तसेवा – मनोज जरांगे-पाटील यांची व्यापक बैठक अंबाजोगाई येथे सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आयोजित करण्यात आली होती. ही बैठक मोठ्या प्रमाणात यशस्वीही झाली. मात्र संवाद बैठकीत खोटी माहिती प्रसारित करून सरकारविरुद्ध प्रक्षोभक भाषण तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा संयोजकावर आरोप ठेवून मनोज जरांगेसह बैठकीचे आयोजन करणारे आयोजक तसेच साधना मंगल कार्यालयाचे मालकावर अंबाजोगाई पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

काल बुधवार रोजी रात्री नऊ वाजता व्यापक बैठकीचे आयोजन साधना मंगल कार्यालयात करण्यात आले होते. बैठकीचे ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त होता. त्या बैठकीला यायला मनोज जरांगे पाटील यांना उशीर झाला. त्यामुळे रात्री नऊ वाजता सुरू होणारी व्यापक बैठक रात्री दहा वाजल्यानंतर सुरू झाली. त्यामुळे रात्री दहा वाजल्यानंतर ध्वनीक्षेप सुरू ठेवून बैठकीसाठी पोलिसांनी घालून दिलेल्या परवानगीचे तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा पोलिसांनी आरोप केला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दाखल फिर्यादीत म्हटले आहे की, मनोज जरांगे यांनी उपस्थित जनसमुदायसमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून शिंदे साहेबांनी आपला विश्वास तोडलाय तुमची हुशारी तुमच्या पाशी ठेवा, मी कट्टर खानदानी आहे, तुम्ही पालक असाल तर तुम्हाला अंतरवालीत महिला दिसल्या नाहीत का, त्यांच्या डोक्याच्या चिंधड्या का केल्या, त्या महिला तुमच्या कोणीच नाहीत का? तुमच्या घरातील ती आई-बहीण आणि आमच्या मराठ्याच्या आई-बहिणीला मुलीच्या पायात गोळी घातली, त्या लेकराची गोळी काढताना दीड लिटर पाणी पायातून निघाले, तिच्यात तुम्हाला आई-बहीण दिसली नाही का, तुम्हाला आमच्यावर काय गुन्हे दाखल करायचे ते करा, आम्ही तुम्हाला हिसका दाखवणारचं, असे जालना अंतरवलीच्या घटनेचा संदर्भात मुलीच्या पायाला अशी कोणतीही गोळी लागलेली नसताना खोटी माहिती प्रसारित करून सार्वजनिक शांतता भंग करण्याच्या उद्देशाने सरकार विरोधात प्रक्षेपक स्वरूपाचे भाषण केले, असा फिर्यादीत आरोप पोलीस कर्मचारी संतोष बदने यांनी केला आहे.

या फिर्यादीवरून प्रमुख वक्ते मनोज जरांगे सह बैठकीचे संयोजक सचिन सुभाषराव जोगदंड (पाटील), राजेसाहेब देशमुख, ॲड माधव जाधव, अमर देशमुख, अजित गरड, रणजीत लोमटे, अमोल लोमटे, राहुल मोरे, ॲड जयसिंग सोळुंके, ॲड किशोर देशमुख, भीमसेन लोमटे, साधना मंगल कार्यालयाचे मालक रविकिरण शामसुंदर मोरे यांच्यावर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात भादवि ५०५ (१) (ब) १८८ सहकलम म पो का १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news