वकीलांची काळ्या कोटाला सुट्टी : उन्हाळ्यात वकिलांना ‘ही’ सवलत | पुढारी

वकीलांची काळ्या कोटाला सुट्टी : उन्हाळ्यात वकिलांना 'ही' सवलत

पुणे : पुढारी वृत्तसेवा : वकील आणि काळा कोट हे समीकरण ठरलेलंच. काळ्या कोटाशिवाय वकील असा विचारही आपण करू शकत नाही. मात्र, उन्हाळ्यात उन्हाचा कडाका वाढू लागल्यानंतर पारंपरिक पोशाखात न्यायालयीन कामकाज करताना वकीलवर्गाला शक्य होत नाही. त्याअनुषंगाने सिव्हिल मॅन्युअलच्या प्रकरण 22 मधील परिच्छेद 636 नुसार वकिलांना कोट वापरास सूट देण्यात आली आहे. त्यानुसार येत्या तीस जूनपर्यंत न्यायालयीन कामकाजात काळ्या कोटचा वापर ऐच्छिक असणार आहे.

काळा रंग सूर्यप्रकाश शोषून घेत असल्यामुळे उन्हाळ्यात काळ्या रंगाचे कपडे वापरणे शक्यतो टाळले जाते. उन्हाळ्यात काळ्या कोटाचा त्रास होऊ नये, यासाठी 15 मार्च ते 30 जून हे तीन महिने तो न वापरण्याची मुभा दिली आहे. काळा कोट वापराच्या सवलतीचा विचार वकिलवर्गाकडून होणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येते.

कोटाशिवाय वकिली कल्पनाही करावीशी वाटत नाही. तापमानामुळे कामकाजावेळी प्रत्येक वेळी कोट घालणे त्रासदायकही ठरते. त्यामुळे, 30 जूनपर्यंतचे काळ्या कोटचे बंधन नाही, ही दिलासादायक बाब आहे. मात्र, असे असले तरीही बहुतांश वकील शक्य तेवढा कोटचा वापर करण्यास प्राधान्य देतात.

– अ‍ॅड. गणेश माने, फौजदारी वकील.

कोट ही वकिलाची ओळख आहे. त्यामुळे उन्हाळ्यातही वकील कोट घालण्यास प्राधान्य देतात. कोट घातलेला वकील असेल तर त्याचा प्रभाव पक्षकारांवर खूप होतो. पक्षकारासाठी काही वकिलांना जाणूनबूजून कोट घालावा लागतो. त्यामुळे, वकिलाची पातळी व त्याच्या ज्ञानावर संशय व्यक्त करत नाही.

– अ‍ॅड. अजिंक्य मिरगळ, फौजदारी वकील.

उन्हाळ्यात सैलसर तसेच हलक्या रंगाचे वस्त्र परिधान करावे. काळ्या रंगाची वस्त्र उन्हाळ्यात शक्यतो टाळणे जास्त फायदेशीर ठरते. वकीलवर्गानेही या गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे.

– डॉ. रोहित औटी, जनरल फिजिशियन.

हेही वाचा

Back to top button