हिंगोली : मिनी बँकेचा अधिकारी असल्याचे सांगत व्यापाऱ्याची २ लाखाची फसवणूक | पुढारी

हिंगोली : मिनी बँकेचा अधिकारी असल्याचे सांगत व्यापाऱ्याची २ लाखाची फसवणूक

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : हट्टा येथील व्यापाऱ्याला मिनी बँकेचा अधिकारी बोलत असल्याचे सांगत एका लिंकवर माहिती व पॅनकार्ड घेऊन बँक खात्यातील २ लाख रुपये परस्पर काढून फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात बुधवारी (दि.१३) गुन्हा दाखल झाला आहे.

हट्टा येथील व्यापारी सतीष आहेर यांचे जयदेवा मल्टीसर्व्हिसेस दुकान आहे. या दुकानातील सर्व व्यवहार ऑनलाईन केले जातात. ४ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीने त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. यामध्ये त्याने मिनी बँकेचा अधिकारी बोलत असून तुमच्या स्पाईसमनी वॉलेटचे पॅनकार्ड अपडेट करण्यासाठी आले असून त्यासाठी एका लिंकवर माहिती भरण्यास सांगितले.

मात्र त्याच्या बोलण्यावर आहेर यांनी विश्‍वास ठेवला नाही. तुम्ही अधिकारी आहात तर प्रत्यक्ष येऊन भेटा व पॅनकार्ड अपडेट करून द्या असे सागितले. त्यावेळी संबंधित व्यक्तीने आहेर यांना त्यांचा बँक खाते क्रमांक, त्यांचे खाते कोणत्या नावे आहे, बँक खात्यात किती रक्कम आहे, याची सर्व माहिती दिली. त्याने दिलेली माहिती खरी असल्याने आहेर यांनी त्याच्यावर विश्‍वास ठेऊन लिंकवर माहिती दिली तसेच पॅनकार्ड पाठविले. त्यानंतर काही वेळातच त्या व्यक्तीने त्यांच्या बँक खात्यातील २ लाख रुपये परस्पर काढून घेतले.

दरम्यान, आहेर हे दुपारी घरी जाऊन परत दुकानावर आले असता एका व्यक्तीने पैसे ट्रान्सफर करायचे असल्याचे सांगितले. त्याचा व्यवहार करण्यासाठी आहेर यांनी बँक खाते तपासले असता बँक खात्यातील २ लाख रुपये काढून घेण्यात आल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने बँकेत जाऊन खाते बंद केले. सायबर पोलिसांना याबाबत माहिती दिली. संबंधित भ्रमणध्वनी क्रमांकाची तपासणी केली असता फेक क्रमांक असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी आहेर यांनी हट्टा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अनोळखी व्यक्ती विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे, जमादार राठोड पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button