व्यापार्‍याला लुटून बॉम्ब साहित्याची खरेदी; एटीएसची धक्कादायक माहिती | पुढारी

व्यापार्‍याला लुटून बॉम्ब साहित्याची खरेदी; एटीएसची धक्कादायक माहिती

पुणे : गेल्या वर्षी सातार्‍यातील साडी व्यापार्‍याला लुटून इसिसच्या दहशतवाद्यांनी बॉम्ब बनविण्याचे साहित्य खरेदी केल्याची धक्कादायक माहिती दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) केलेल्या तपासात समोर आली आहे. याप्रकरणी एटीएसने नवीन गुन्हा दाखल केला असून आतापर्यंत तिघांना अटक केली आहे. तिघांनाही विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी 21 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

मोहम्मद शहानवाज आलम शफीअब्दुल्ला ऊर्फ इब्राहिम (31, रा. झारखंड), मोहम्मद युनुस मोहम्मद याकुब साकी ऊर्फ छोटु (27, रा. मध्यप्रदेश रतलाम) आणि जुल्फिकार अली बरोडावाला ऊर्फ लाला ऊर्फ लालाभाई (44, रा. भिवंडी ठाणे) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. सातारामधील अजिंठा चौकातील एका साडी व्यापार्‍याने सातारा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. 8 एप्रिल 2023 रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सातारामधील अजिंठा चौकातील गणपती सिल्क साडी या दुकानाचे मालक दुकान बंद करत असताना अचानक दोघेजण पिस्तुलासह आत शिरले. त्यातील एकाने पिस्तुलाचा धाक दाखवला व दुसर्‍याने त्यांची तीन दिवसांची जमा झालेली एक लाखांची रोकड चोरी केली. त्यानंतर दोघेही दुचाकीवरून पळून गेले. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला.

दरम्यान, मागील वर्षी पुण्यातील कोथरूड पोलिसांनी चोरी करताना तिघांना पकडले. पकडलेले तिघेही दहशतवादी असल्याचे तपासात निष्पन्न झाले. व्याप्ती मोठी असल्याने हा गुन्हा पुणे पोलिसांकडून एटीएसकडे सोपविण्यात आला. याच दरम्यान या दहशतवाद्यांनी सातार्‍यातील व्यापार्‍याला लुटल्याचा प्रकार समोर आल्यानंतर एटीएसने नव्याने गुन्हा दाखल केला. आरोपींनी व्यापार्‍याला लुटल्यानंतर लुटीची रक्कम बॉम्ब बनविण्याचे साहित्य खरेदी करण्यासाठी वापरल्याचे तपासात निष्पन्न झाले. विशेष सरकारी वकील विजय फरगडे यांनी आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. न्यायालयाने तिघांनाही 21 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

तपासात आरोपींकडून दिशाभूल

इसिस संघटनेच्या सदस्यांनी कट रचून जबरी चोरी केल्याचा प्रकार निष्पन्न झाला. त्यांच्याकडून चोरी केलेली रक्कम जप्त करायची आहे. त्यातील काही रक्कम बॉम्बचे साहित्य खरेदी करण्यासाठी वापरल्याचे निष्पन्न झाले आहे. गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करायची आहे. त्यांनी गुन्ह्यात वापरलेली दोन पिस्तुले कोठून आणली याचा तपास करायचा आहे. तपासात आरोपी दिशाभूल करत आहेत. त्यांनी दहशतवादी कारवाईसाठी निधी उभारण्यासाठी हा गुन्हा केला आहे. त्यांनी असे किती गुन्हे केले, किती जणांचा सहभाग आहे, याचा तपास करण्यासाठी तिघांनाही पोलिस कोठडी सुनावण्याची मागणी करण्यात आली होती.

हेही वाचा

Back to top button