शरद पवारांच्या संपर्क मोहीमेला उद्या बारामतीत अजित पवारांकडून उत्तर | पुढारी

शरद पवारांच्या संपर्क मोहीमेला उद्या बारामतीत अजित पवारांकडून उत्तर

बारामती : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गुरुवारी (दि. 14) बारामती तालुक्यात तब्बल सात सभांचे आयोजन करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीमुळे शरद पवार यांनी बारामती तालुक्यात संपर्क मोहीम सुरू केली आहे. ते छोटे मेळावे, भेटीगाठी घेत आहेत. आता अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील शरद पवार यांच्या या संपर्क मोहीमेला उत्तर देण्याची सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी याबाबत सांगितले की, सकाळी आठ वाजेपासूनच अजित पवार हे दौर्‍यास सुरुवात करणार असून सुपे येथे सकाळी साडेआठ वाजता दौरा पार पडणार आहे.

सुप्यानंतर करंजेपुल येथे सकाळी साडेदहा वाजता मुख्य चौकात पवार हे मतदारांशी संवाद साधणार आहेत. अकरा वाजता कोर्‍हाळे बुद्रुक येथे तर दुपारी दोन वाजता माळेगाव येथे संपर्क दौर्‍याचे नियोजन करण्यात आले आहे. दुपारी साडेतीन वाजता निरावागज ग्रामपंचायत येथे तर सायंकाळी साडेपाच वाजता झारगडवाडी ग्रामपंचायत येथे सभा होणार आहे. बारामती एमआयडीसी येथील पेन्सिल चौकात सायंकाळी साडेसहा वाजता शेवटची सभा पार पडणार आहे. या दौर्‍यात उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार यांची घोषणा करण्याची शक्यता आहे.

हेही वाचा

Back to top button