No Smoking Day Special : ई-सिगारेटही आरोग्याला घातकच! | पुढारी

No Smoking Day Special : ई-सिगारेटही आरोग्याला घातकच!

प्रज्ञा केळकर-सिंग

पुणे : सिगारेटला फाटा देत तरुणाई ई-सिगारेटकडे वळू पाहत आहे. ई-सिगारेट देखील आरोग्यास तेवढीच घातक असल्याचे श्वसनरोगतज्ज्ञ सांगतात. ई-सिगारेटच्या फ्लेवर्सबद्दल तरुणाईमध्ये आकर्षण निर्माण होत आहे. त्यामुळे तरुण व्यसनांच्या धोकादायक चक्रात अडकत आहेत. दर वर्षी 13 मार्च रोजी धूम्रपानविरोधी दिवस साजरा केला जातो. धूम्रपानामुळे होणा-या दुष्परिणामांबद्दल जनजागृती करण्याचा प्रयत्न सुरू असताना आता ई-सिगारेटच्या वाढत्या व्यसनाचे आव्हान आ वासून उभे राहिले आहे. ई-सिगारेटची आकर्षक रचना, विनाकारण मिळालेली प्रतिष्ठा, त्यामध्ये उपलब्ध असलेले फ्लेवर्स यामुळे तरुणांना ई-सिगारेटचे वेड लागले आहे.

मात्र, यामुळे तीव्र न्यूमोनिया, श्वास घेण्यास त्रास, ताप, थकवा, कफ अशा समस्या कायमस्वरुपी उद्भवत आहेत. ई-सिगारेटच्या सततच्या सेवनाने मळमळ, पोटात दुखणे, उच्च रक्तदाब, ह्रदयाचे ठोके वाढणे असे त्रास उद्भवत आहेत. ई-सिगारेटला पायबंद घालायचा असल्यास धोरणकर्ते, आरोग्य व्यावसायिकांवर ठोस कारवाई करणे अनिवार्य आहे. जागरूकता वाढवून, प्रभावी नियमांची अंमलबजावणी करून ई-सिगारेटशी संबंधित हानी रोखता येऊ शकते, याकडे डॉक्टरांनी लक्ष वेधले आहे.

धूम्रपान सोडण्यासाठी खूप समर्पण, इच्छाशक्ती, कुटुंबाचा पाठिंबा, चिकाटी आणि वेळ लागतो. तंबाखू किंवा धूम्रपान सोडण्यासाठी कोणतेही औषध 100% प्रभावी नाही. इतर औषधे बुप्रोपियोन आणि वेरिनिकलाइन आहेत. ही अँटीडिप्रेसंट औषधे आहेत. औषधांचे काही दुष्परिणामही असू शकतात. त्यामुखे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे घेऊ नयेत.

– डॉ. हर्षल मेहता, पल्मोनॉलॉजिस्ट

ई-सिगारेटमुळे आरोग्याच्या दृष्टीने अनेक धोके निर्माण होतात. विशेषत: मुले आणि धूम—पान न करणार्‍यांवर त्यांच्या प्रभावामुळे. यातून उत्सर्जित होणारे एरोसोल निकोटीन, ऑगनिक कंपाउंड्स आणि विषारी पदार्थांचा समावेश असतो. या रसायनांच्या इनहेलेशनमुळे फुफ्फुसाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. ई-सिगारेटमुळे श्वसनाचे आजार उद्भवतात. त्याप्रमाणे, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजारही बळावतात. निकोटीनच्या दुष्परिणामांवर फ्लेवर्सचा मुखवटा घालून तरुणाईची दिशाभूल केली जात आहे.

– डॉ. मुरारजी घाडगे, सल्लागार ईएनटी आणि स्लीप डिसऑर्डर विशेषज्ञ, रुबी हॉल क्लिनिक

हेही वाचा

Back to top button