भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांची उमेदवारी ठरली? कार्यकर्त्यांच्या चर्चेचा सूर | पुढारी

भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांची उमेदवारी ठरली? कार्यकर्त्यांच्या चर्चेचा सूर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे लोकसभा मतदारसंघासाठी भाजपतर्फे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचे नाव निश्चित झाल्याची चर्चा पक्ष कार्यकर्त्यांच्या वर्तुळात आज दिवसभर सुरू होती. भाजपकडून मात्र अद्याप महाराष्ट्रातील अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. राज्यातील उमेदवारांबाबत निर्णय घेण्यासाठी भाजपच्या निवड समितीची बैठक सोमवारी रात्री दिल्लीत झाली. त्या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते महाराष्ट्रातील उमेदवार निवडीच्या बैठकीला उपस्थित होते. भाजपचे खासदार असलेल्या मतदारसंघाबाबत प्रामुख्याने आढावा घेण्यात आला.

सात राज्यातील उमेदवारांविषयी चर्चा झाल्याने आज त्यांची यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, भाजपची उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर झाली नाही. मोहोळ यांच्याबरोबरच माजी आमदार जगदीश मुळीक, पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर, फ्रेंडस ऑफ बीजेपीचे शिवाजी मानकर यांचीही नावे पुण्यातून इच्छुक उमेदवार म्हणून गेले काही दिवस चर्चेत आहेत. मोहोळ यांचे नाव निश्चित झाल्याची चर्चा कार्यकर्त्यांत दिवसभर सुरू असली, तरी पक्षनेतृत्वाने धक्कातंत्र वापरल्यास अन्य इच्छुकांचे नावही जाहीर होऊ शकते, असाही काही जणांच्या चर्चेचा रोख होता.

हेही वाचा

Back to top button