पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेतल्या जाणार्या परीक्षांसाठी येत्या परीक्षेपासून पुरवणीशिवाय परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी 24 पानी आणि 36 पानी उत्तरपत्रिका दिली जाणार आहे. परंतु, एवढी मोठी उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना देण्याची आवश्यकता नाही. हा निर्णय पर्यावरणाला घातक तर आहेच; शिवाय उत्तरपत्रिकेतील पाने वाया घालविणारा आहे. त्यामुळे या निर्णयाचा विद्यापीठाने पुनर्विचार करावा, असे मत विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील प्राध्यापकांनी व्यक्त केले आहे.
विद्यापीठाशी संलग्न पुणे, अहमदनगर व नाशिक या जिल्ह्यांतील महाविद्यालयांमध्ये साधारण साडेसात लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना पूर्वी परीक्षेसाठी उत्तरपत्रिका व पुरवणी दिली जात होती. विद्यापीठाला उत्तरपत्रिका व पुरवणीसाठी स्वतंत्र खर्च येत होता.
तसेच, उत्तरपत्रिकांचे व पुरवणीचे वितरण करावे लागत होते. विद्यार्थ्यांना कमी पानाच्या उत्तरपत्रिकांबरोबर काहीवेळा एकापेक्षा जास्त पुरवण्या जोडाव्या लागत होत्या. परीक्षेदरम्यान या पुरवण्यांचे स्वतंत्रपणे मास्किंग करावे लागत होते. त्यात बराच वेळ जात होता. तसेच, विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेला जोडलेल्या पुरवण्या गहाळ होत असल्याच्या तक्रारीही येत होत्या. त्यामुळे विद्यापीठाच्या अधिकार मंडळाने परीक्षेसाठी यापुढील काळात 50 गुणांपर्यंतच्या परीक्षेसाठी 24 पानी उत्तरपत्रिका आणि त्यापुढील 70 ते 100 गुणांच्या परीक्षेसाठी 36 पानी उत्तरपत्रिका देण्याचा निर्णय घेतला आहे.
यासंदर्भात प्राध्यापकांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यापीठाचा हा निर्णय पर्यावरणपूरक नाही. वर्गातील परीक्षा देणारे केवळ 10 ते 20 टक्के विद्यार्थी पुरवणी वापरतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक तेवढीच पुरवणी विद्यापीठाने देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका लिहिल्यानंतर ती तपासताना संबंधित प्राध्यापक मोकळ्या पानांवर लाल शाईच्या पेनने रेष मारतात. त्यामुळे नंतर त्या पानांचा काहीही उपयोग होत नाही. यातून केवळ पुरवणी देण्याचा तसेच मूळ उत्तरपत्रिकेला ती बांधण्याचा त्रास वाचणार आहे. ऑनलाइन मूल्यमापनासाठी पुरवणी स्कॅन करताना अडचण येईल का? याचा विचार करून हा निर्णय घेतला आहे का? याची चाचपणी केली असता काही महाविद्यालयांनी ऑनलाइन मूल्यमापनाचा पायलट प्रोजेक्ट केला आहे. यामध्ये उत्तरपत्रिकेत ज्या पानांवर काहीही लिहिले नाही अशी पाने देखील स्कॅन करावी लागणार आहेत.
त्यामुळे उत्तरपत्रिकेतील पानांची संख्या वाढविल्यास स्कॅनिंगचा देखील खर्च वाढणार असल्याचे उघडकीस आले आहे. पर्यावरणरक्षण ही काळाची गरज असताना तसेच ऑनलाइन किंवा पेपरलेस परीक्षांकडे जात असताना अशा प्रकारचा निर्णय हा चुकीचा ठरणार आहे. विद्यार्थी 80 गुणांच्या पेपरसाठी 20 ते 24 पाने लिहितात. त्यामुळे उत्तरपत्रिकांची पाने वाया जाणार असून, यातून केवळ उत्तरपत्रिका पुरविणार्या कंत्राटदारांचे उखळ पांढरे होणार असल्याचे देखील प्राध्यापकांनी स्पष्ट केले आहे.
परीक्षा समितीने पूर्ण अभ्यास करूनच पुरवणीशिवाय परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठ घेत असलेली परीक्षा 30 ते 100 गुणांपर्यंत असते. विद्यार्थी 33 पानांपर्यंत लिहित आहेत. त्यामुळे 36 पानी उत्तरपत्रिका दिली तरी केवळ दोन ते तीन पाने अतिरिक्त राहणार आहेत. तरीदेखील अभ्यास करून आवश्यकता असल्यास उत्तरपत्रिकेची पाने कमी करण्यात येतील.
– डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
परीक्षेच्या काळात नक्की किती टक्के विद्यार्थी पुरवणी वापरतात, याचा विद्यापीठाने महाविद्यालयीन स्तरावर आढावा घेणे गरजेचे आहे. त्यानंतरच या निर्णयाची अंमलबजावणी केल्यास योग्य राहणार आहे.
– डॉ. राजेंद्र झुंजारराव, प्राचार्य, मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, पुणे
हेही वाचा