सांगलीतील ‘पिनॉमिक ग्लोबल’कडून गुंतवणूकदारांची कोट्यवधीची फसवणूक; प्रमुख तीन एजंटांना अटक | पुढारी

सांगलीतील ‘पिनॉमिक ग्लोबल’कडून गुंतवणूकदारांची कोट्यवधीची फसवणूक; प्रमुख तीन एजंटांना अटक

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : महिन्याला 15 ते 17 टक्के परतावा; शिवाय 10 महिन्यांनंतर गुंतवलेल्या रकमेच्या दीडपट मुद्दल देण्याच्या आमिषाने कोल्हापूर, सांगलीसह पश्चिम महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकातील शेकडो गुंतवणूकदारांना कोट्यवधीचा गंडा घालणार्‍या सांगली येथील पिनॉमिक ए. एस. ग्लोबल कंपनीच्या तीन प्रमुख एजंटांना शाहूपुरी पोलिसांनी मंगळवारी अटक केली. नोव्हेंबर 2022 मध्ये शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित पसार झाले होते. नितीन रवींद्र परीट (वय 32, सोळांकूर, ता. राधानगरी), मल्लाप्पा आप्पा पुजारी (48, अब्दुललाट, ता. शिरोळ), भैरवनाथ निवृत्ती पालकर (53, पालकरवाडी, ता. राधानगरी), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. संशयितांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणातील मुख्य संशयित पंकज नामदेव पाटील, अभिजित श्रीकांत जाधव (रा. तासगाव, जि. सांगली), संतोष गंगाराम घोडके (39. यरगट्टी, ता. चिकोडी, बेळगाव) यांच्यासह 6 जणांवर अमोल धोंडिराम शेटके (रा. कसबा बावडा) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. शेटके यांची 18 लाख 30 हजार, तर अन्य गुंतवणूकदारांची सुमारे 1 कोटी 83 लाख 92 हजार
र 540 रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

2 हजारांवर गुंतवणूकदारांची 40 कोटींची फसवणूक शक्य

राधानगरी, चंदगड व पन्हाळा तालुक्यांतील दोनशेहून अधिक गुंतवणूकदारांनी शाहूपुरी पोलिस ठाण्याकडे धाव घेऊन तक्रार अर्ज दाखल केला आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांसह गोवा व कर्नाटकातील किमान दीड ते दोन हजारांवर गुंतवणूकदारांची सुमारे 35 ते 40 कोटींची फसवणूक केली असावी, असा प्राथमिक अंदाज असल्याचेही तपासाधिकार्‍यांनी सांगितले. मुख्य सूत्रधार पंकज पाटील याने कोल्हापूर शहरासह ग्रामीण भाग व सीमावर्ती भागातून गुंतवणूकदारांकडून मोठ्या रकमा जमा करण्यासाठी नितीन परीट, मल्लाप्पा पुजारी, भैरवनाथ पालकर यांची नियुक्ती केली. ठिकठिकाणी सेमिनार घेऊन गुंतवणूकदारांना विविध आमिषे दाखवली.

दीड वर्षानंतर कंपनीने गाशा गुंडाळला!

सुरुवातीच्या काळात गुंतवणूकदारांना परताव्याच्या रकमा नियमित देण्यात आल्या; शिवाय दहा महिन्यांनंतरही गुंतवणूक केलेल्या रकमा दीडपट देण्यात आल्याने गुंतवणूकदारांचा ओघ वाढला. दीड वर्षानंतर मात्र कंपनीने गाशा गुंडाळला.

दोन वर्षांपासून संशयित पसार

गुंतवणूकदारांनी तगादा लावल्यानंतर कार्यालयालाही टाळे ठोकण्यात आले. मुख्य सूत्रधारासह संचालक, एजंटही फरार झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गुंतवणूकदारांनी नोव्हेंबर-डिसेंबर 2022 मध्ये पोलिस ठाण्याकडे धाव घेऊन तक्रार दाखल केली.

मालमत्ता ताब्यात घेणार

प्रमुख सूत्रधार व एजंटांच्या आर्थिक उलाढालीची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. कंपनीचे खाते गोठविण्याची प्रक्रियाही यापूर्वीच करण्यात आली आहे. संबंधितांच्या स्थावर मालमत्तांचा छडा लावण्यासाठी महसूल यंत्रणेशी संपर्क साधण्यात आल्याचेही तपासाधिकार्‍यांनी सांगितले. फरार संशयितांना अटक करून त्यांची स्थावर मालमत्ता ताब्यात घेण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे, असे तपासाधिकारी क्रांती पाटील यांनी सांगितले.

Back to top button