‘यशवंत’साठी आज निर्णायक मतदान : उरुळी कांचन येथे उद्या मतमोजणी | पुढारी

‘यशवंत’साठी आज निर्णायक मतदान : उरुळी कांचन येथे उद्या मतमोजणी

उरुळी कांचन : पुढारी वृत्तसेवा : वैयक्तिक हल्ले, आरोप-प्रत्यारोपांनी जिल्ह्यात चर्चेची राळ उठलेल्या थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी शनिवारी (दि. 9) मतदान पार पडत असून, रविवारी मतमोजणी उरुळी कांचन येथे पार पडणार आहे. तब्बल 13 वर्षे बंद असलेला कारखाना सुरू होण्याची आशा निर्माण झाल्याने मतदानावरून सभासदांत मोठी उत्सुकता आहे. गेली 13 वर्षे प्रत्येक राजकीय पक्षाने प्रत्येक निवडणुकीत ’यशवंत’ सुरू करू, अशी पोकळ आश्वासने दिली आहेत. मात्र, 13 वर्षे कारखान्यासाठी ना कोणते नेते, ना राज्य शासन मदतीसाठी धावून न आल्याने सभासदांना न्यायालयात जाऊन कारखान्याच्या भवितव्यासाठी निवडणुकीचा मार्ग अवलंबवा लागला आहे. त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयात अथक लढ्यानंतर तब्बल 15 वर्षांनंतर या कारखान्याची निवडणूक होत आहे.

कारखान्याच्या निवडणुकीसाठी 55 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, निवडणुकीसाठी तालुक्यातील सर्वपक्षीय राजकारण्यांचे दोन गट समोरासमोर आले आहेत. कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माधव काळभोर, बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश म्हस्के, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव कांचन, महाराष्ट्र केसरी पहिलवान राहुल काळभोर यांच्या नेतृत्वाखाली अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनेल व हवेली बाजार समितीचे माजी सभापती व विद्यमान संचालक प्रकाश जगताप, बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर, हवेली पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब चौधरी यांच्या नेतृत्वाखाली अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनेल निवडणूक लढवत आहे. तर इतर 13 उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. शनिवारी (दि. 9) 42 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. एकूण 21,019 मतदार मतदानासाठी पात्र आहेत. त्यासाठी राज्य सहकार प्राधिकरणाने 250 कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शीतल पाटील, सहायक निवडणूक अधिकारी श्रीकांत श्रीकांदे व हर्षित तावरे हे काम सांभाळत आहेत.

हेही वाचा

Back to top button