एक ठराव असाही : मुलीचा विवाह पदवीधर झाल्यानंतरच | पुढारी

एक ठराव असाही : मुलीचा विवाह पदवीधर झाल्यानंतरच

रावणगाव : पुढारी वृत्तसेवा : स्वामी चिंचोली ग्रामपंचायतच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी आयोजित महिला सभेत गावातील प्रत्येक मुलीचा विवाह हा तिचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतरच करण्यात यावा. कोणत्याही मुलीचे शिक्षण अर्धवट ठेवून तिचा घाई-गडबडीत विवाह करू नये, असा ठराव महिलांनी एकमताने मंजूर केला. सर्वप्रथम सरपंच पूनम मदने यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. ग्रामपंचायत सदस्या अनुजा वेताळ, हिना शेख, धनाजी मत्रे, पद्माकर कांबळे, ग्रामसेविका स्वाती लोंढे तसेच सर्व अंगणवाडीसेविका, आशासेविका, पोस्टमन सृष्टी बाबर व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

या वेळी ग्रामपंचायतीच्या वतीने सुकन्या समृद्धी योजना, लेक लाडकी योजना या योजनांचा लाभ देण्याकरिता शिबिर घेण्यात आले. यामध्ये गावातील प्रत्येक 1 ते 10 वयोगटातील मुलीचे सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत ग्रामपंचायतीच्या वतीने मोफत खाते उघडून देण्यात आले. तसेच गावातील सर्व महिला बचत गटांना ग्रामपंचायतीच्या वतीने मोफत रजिस्टर वाटप करण्यात आले. महिला कर्मचारी, सफाई महिला कर्मचार्‍यांचा सन्मानचिन्ह व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी धनाजी मत्रे, अनुजा वेताळ, स्वाती लोंढे यांनी मनोगत व्यक्त केले. आभार मच्छिंद्र मदने यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महंमद शेख, तुकाराम गोलांडे यांनी प्रयत्न केले.

हेही वाचा

Back to top button