महात्मा फुले योजनेची मर्यादा वाढवण्यास मिळेना मुहूर्त | पुढारी

महात्मा फुले योजनेची मर्यादा वाढवण्यास मिळेना मुहूर्त

प्रज्ञा केळकर -सिंग

पुणे : महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेची मर्यादा दीड लाखावरून पाच लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची आणि योजना सरसकट सर्वांना लागू करण्याची क्रांतिकारी घोषणा गेल्या वर्षी अर्थसंकल्पात करण्यात आली खरी; त्यानंतर या वर्षीचाही अर्थसंकल्प जाहीर झाला. मात्र, घोषणा केवळ कागदावरच राहिली आहे. योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यास राज्यशासनाला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही.फमहात्मा फुले जनआरोग्य योजनेची मर्यादा वाढवण्याबरोबरच योजना सरसकट सर्वांना लागू करण्याची घोषणा झाल्याने नागरिकांकडून स्वागत झाले. महागडे उपचार आवाक्यात येतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. मात्र, खर्चाची मर्यादा वाढवण्याची आणि सरसकट लागू करण्याची घोषणा केवळ फार्सच राहिली आहे. सामान्यांच्या दृष्टीने तातडीने निर्णय घेणे अपेक्षित असताना योजना लाल फितीत अडकल्याची परिस्थिती दिसून येत आहे.

शासनाने मागील वर्षी महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना एकत्रित करून यामध्ये नव्याने समावेश करण्यात आलेल्या आजारांची यादी प्रसिद्ध केली. महात्मा फुले योजनेमध्ये 996 प्रकारच्या आजारांचा समावेश आहे. या योजनेंतर्गत उपचारांसाठी दीड लाख रुपयांपर्यंतची मदत दिली जाते. प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत 1350 आजार समाविष्ट असून, यामध्ये साडेतीन लाख रुपयांपर्यंतची मदत दिली जाते. मात्र, सध्या अनेक रुग्णांना मदत मिळवताना अनेक अडथळ्यांचा सामना करावा
लागत आहे. राज्यशासनाची महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना व केंद्र शासनाची आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जनआरोग्य या दोन्ही योजना एकत्रितपणे राबवल्या जात आहेत. पिवळी शिधापत्रिका, अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिका, अन्नपूर्णा योजना शिधापत्रिका व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबे या योजनेस पात्र आहेत. पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे, त्यांना या योजनेचा लाभ घेता येतो. मात्र, प्रत्यक्षात लाभ मिळवताना रुग्णाच्या नातेवाइकांना धावपळ करावी लागत आहे.

लाभार्थ्यांवरील उपचारांसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत दीड लाख रुपयांची मदत दिली जाते. उपचारांसाठी जास्त खर्च येणार असल्यास आणि लाभार्थी प्रधानमंत्री योजनेसाठी पात्र असल्यास साडेतीन लाख रुपयांची मदत केली जाते. रुग्ण महाराष्ट्राबाहेरील असल्यास प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार
मोफत होतात.
– डॉ. वैभव गायकवाड,

जिल्हा समन्वयक, महात्मा फुले जनआरोग्य योजना सध्याची योजना कोणाला लागू?

  • केशरी/ पिवळे रेशनकार्ड असेल तर महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू होते.
  • आयुष्मान प्रधानमंत्री योजनेमध्ये 2011 मध्ये सोशिओ इकोनॉमिक वर्गाचा झालेल्या गणनेमध्ये लाभार्थी समाविष्ट असल्यास योजना लागू होते.
  • नवीन योजना सरसकट सर्वांना लागू होणार आहे.

हेही वाचा

Back to top button