

पुणे : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीमध्ये वापरण्यात येणारे ईव्हीएम यंत्र ठेवण्यात आलेल्या कोरेगाव पार्क येथील फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या गोदामातील फायर अलार्म अचानक वाजले. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनाची धावपळ उडाली.
सासवड येथे ईव्हीएम यंत्र चोरीला गेल्यानंतर प्रांत, तहसीलदार यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले. तेव्हापासून ईव्हीएमची विशेष सुरक्षा प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. ईव्हीएम यंत्र ठेवण्यात आलेल्या कोरेगाव पार्क येथील फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (एफसीआय) गोदामातील फायर अलार्ममध्ये तांत्रिक बिघाड झाले.
त्यामुळे अचानक अलार्म वाजायला सुरुवात झाली. ही घटना गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. सुरक्षा रक्षकांनी ही माहिती जिल्हा प्रशासनाला दिली. त्यानंतर भारत निवडणूक आयोगाच्या अनुमतीने आणि राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या उपस्थितीत दुरुस्ती करण्यात आली आहे. सर्व ईव्हीएम यंत्र सुस्थितीत असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे.
पुणे महानगरपालिकेच्या मुख्य अग्निशमन अधिकार्यांकडून तांत्रिक बाबी संदर्भात अहवाल मागविण्यात आला आहे. तो प्राप्त होताच अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये या दृष्टीने आवश्यक खबरदारीच्या अतिरिक्त उपाययोजना करण्यात येणार आहेत, असे जिल्हा निवडणूक प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
गोदामात अग्निशमन यंत्रणा आहे आणि कडक सुरक्षा व्यवस्थादेखील आहे. तांत्रिक बिघाडामुळे झालेल्या या प्रकाराची माहिती प्रशासनाने निवडणूक आयोगाला दिली. राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींसमक्ष आवश्यक दुरुस्ती करण्यात आली आहे. सर्व ईव्हीएम यंत्र सुस्थितीत आहे.
– डॉ. सुहास दिवसे, जिल्हाधिकारी.
हेही वाचा