पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाकडे (म्हाडा) विविध योजनांतर्गत उपलब्ध होणारी घरे आणि खासगी भागीदारीच्या योजनेतील अशी चार हजार 777 घरे ऑनलाइन सोडतीद्वारे उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी शुक्रवार (दि.7) घरांसाठी अर्ज करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या वतीने (म्हाडा) प्रथमच सोडतीमध्ये सर्वसामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध करण्यासाठी आता खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वाचा अवलंब करण्यात आला आहे. आचारसंहिता कालावधीत अर्ज करण्याची मुभा आहे.
आचारसंहिता संपल्यानंतर ही सोडत काढण्यात येईल, अशी माहिती म्हाडाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्या वेळी म्हाडाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील उपस्थित होते. आकर्षक घरे बांधण्याचे म्हाडाचे स्वप्न आहे. चांगल्या बांधकाम व्यावसायिकांच्या माध्यमातून परवडणारी घरे आतापर्यंत बांधण्यात आली. पण किंमतीचा विचार करण्यात आला नाही. त्यामुळे म्हाडाच्या घरांकडे ग्राहकांनी पाठ फिरविली. त्यामुळे काही तरी गणित चुकल्याची कबुली सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली. पुढील काळात परवडणारी घरे उपलब्ध करण्यावर भर देण्यात येणार आहे.
म्हाडाच्या पुणे मंडळांतर्गत म्हाडा गृहनिर्माण योजना, प्रधानमंत्री आवास योजना, 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना आणि पीपीपी योजनेतील या घरांचा सोडतीमध्ये समावेश असेल. 20 टक्के सर्व समावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत 745 तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांमधील 561 अशा 1306 सदनिका, प्रथम येणार्यास प्रथम प्राधान्य योजनेंतर्गत 2416 सदनिका, म्हाडाच्या विविध योजनेतील 18 सदनिका, म्हाडा पीएमएवाय 59 सदनिका, पीएमएवाय – खासगी भागीदारी तत्त्वाच्या योजनेंतर्गत 978 सदनिका अशा चार हजार 777 सदनिकांचा सोडतीत समावेश आहे.
हेही वाचा