केडगाव : पुढारी वृत्तसेवा : वासुंदे गावच्या परिसरातील स्टोन क्रशरचे मालक आणि व्यवस्थापक यांच्याकडून दादागिरी, अरेरावी करीत धमकी दिली जात आहे. याबाबत दौंडचे तहसीलदार अरुण शेलार यांच्याकडे किशोर युवराज जांभले या शेतकऱ्याने तक्रार केली आहे.
किशोर जांभले हे वासुंदे येथील रहिवासी असून शेतकरी आहेत. गट नंबर 406 व जिरेगाव गट नंबर 433 मध्ये त्यांची शेती आहे. शेतीलगतच क्रिस्टल सिलिकेट्स प्रायव्हेट लिमिटेडची व्ही. एच. खत्री स्टोन कंपनी, आदित्य तावरे स्टोन क्रशर, कोहिनूर स्टोन क्रशर आदी स्टोन क्रशर उद्योग आहेत.
या क्रशरपासून परिसरात प्रचंड धूळ निर्माण होत असून शेतातील पिकांचे उत्पन्न गेले दहा वर्षांपासून झालेले नाही. तसेच क्रशरपासून होणार्या बोअर ब्लास्टमुळे विहिरी व बोअरवेलचे पाणी आटले आहे. घरांना असणार्या भिंतींना तडे गेले आहेत. शेतकर्यांबरोबरच वन्यजीवन देखील धोक्यात आले आहे. याबाबत क्रशरचे मालक व व्यवस्थापक यांना क्रशरपासून उडणार्या धुळीबाबत उपाययोजना करण्यास सांगितले असता त्यांनी अरेरावीची भाषा वापरत आहेत, असे सांगून धमकावल्याचे जांभले यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
या भागात बारामती, पुणे, फुलगाव, कुंजीरवाडी आदी भागातून आलेल्या आणि राजकीय आशीर्वाद असलेल्या व्यक्तींनी स्टोन क्रशर उभारलेले असून एका क्रशरसाठी एका मंत्र्याचे स्वीय सहाय्यक यांनी दौंड महसूल प्रशासनावर कारवाई न करण्यासाठी दबाव टाकल्याची गोपनीय माहिती आहे. हा स्वीय सहाय्यक कोण, हा मंत्री कोण हा सर्वात मोठा संशोधनाचा विषय आहे.
हेही वाचा