पुरंदर उपसाचे समन्यायी पद्धतीने पाणी वाटप करा : वरिष्ठ अधिकार्‍यांचे निर्देश

पुरंदर उपसाचे समन्यायी पद्धतीने पाणी वाटप करा : वरिष्ठ अधिकार्‍यांचे निर्देश

सासवड : पुढारी वृत्तसेवा : पुरंदर उपसा सिंचन योजनेचा दुसरा पंप दुरुस्तीसाठी आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करून दोन दिवसांत दुसरा पंप सुरू करा आणि समन्यायी पद्धतीने पाणी वाटप करण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकारी यांनी पुरंदर उपसा योजनेच्या अधिकार्‍यांना दिले आहेत. पुणे (सिंचन भवन) येथे पुरंदर उपसा योजनेच्या व्यवस्थापन व पाणी वाटप नियोजन, याचा आढावा घेण्यासाठी माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सर्व वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली. त्या बैठकीत हे निर्देश देण्यात आले. पुरंदर उपसा जलसिंचन योजना तालुक्याच्या पूर्व भागासाठी वरदान ठरली आहे.

ऐन दुष्काळी परिस्थितीत पूर्व पुरंदरमधील योजनेचे लाभधारक हवालदिल झाले आहेत. ऊस, कांदा पीक आणि चार्‍याचा प्रश्न गंभीर असताना पुरंदर उपसा सिंचन योजना बंद आहे. शेतीत टाकलेले लाखो रुपये यामुळे मातीमोल होणार असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे पुणे (सिंचन भवन) येथे पुरंदर उपसा योजनेच्या व्यवस्थापन व पाणी वाटप नियोजन, याचा आढावा घेण्यासाठी माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सर्व वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत बैठक घेतली. या वेळी कृष्णा खोरे महामंडळाचे कार्यकारी अभियंता अतुल कपोले, मुख्य अभियंता (सिंचन विभाग, पुणे) हनुमंत गुनाले, तांत्रिक विभागाचे अभियंता प्रकाश भोसले, तांत्रिक विभागाचे उपअभियंता नितीन जयस्वाल, पुरंदर उपसा व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता महेश कानेटकर, उपअभियंता गौतम शिंदे, शाखा अभियंता नीलेश लगड, मोहन कांबळे, युवासेना तालुकाध्यक्ष नितीन कुंजीर, उपजिल्हाप्रमुख सागर मोकाशी, सोनोरीचे सरपंच भारत मोरे, सिंगापूरचे उपसरपंच विशाल लवांडे, दत्ता काळे, आंबळे गावचे अशोक जगताप, माळशिरसचे संतोष यादव, आदेश
यादव, पिंपरीचे दादा मारणे आदी शेतकरी उपस्थित होते.

या बैठकीत पाणीपट्टी यापुढे रोख स्वरूपात न देता क्यूआर कोड अथवा बँकेत जमा करण्याचे आवाहन वरिष्ठ अधिकार्‍यांनी केले. पुरंदरमधील फळबागा व चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनल्याने त्यावर पर्याय फक्त योजना पूर्णक्षमतेने चालू करणे हाच आहे, असे विजय शिवतारे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले तसेच पाण्याचे वाटप समन्यायी पध्दतीने करण्याचे देखील सूचित केले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news