वणव्यांचा कहर; वन्यप्राण्यांची वस्त्यांकडे धाव | पुढारी

वणव्यांचा कहर; वन्यप्राण्यांची वस्त्यांकडे धाव

भोर : पुढारी वृत्तसेवा : मागील आठवडाभरापासून उन्हाची तीव्रता वाढली आहे, तर डोंगररांगांना ठिकठिकाणी वणवे लागण्याचे प्रकार भोर तालुक्यातील जंगलपट्ट्यात घडत आहेत. त्यामुळे आधीच अन्न-पाण्याच्या शोधात असलेले पशुपक्षी, वन्यप्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. अनेक पशुपक्षी, वन्यप्राणी मानवी वस्त्यांकडे भटकंती करू लागल्याचे दिसून येत आहेत. मार्च महिन्याची सुरुवात होताच उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. त्यामुळे जंगल भागातील पाण्याचे स्रोत आटू लागले आहेत. परिणामी, पशुपक्षी, वन्यप्राण्यांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. तर दुसरीकडे डोंगररांगांना ठिकठिकाणी वणवे लागत आहेत. यामध्ये अनेक वन्यप्राण्यांचे बळी जात आहेत. त्यांचा अधिवास संपत आहे. तर यातून बचावलेले अन्न-पाण्याने व्याकूळ झालेले पशुपक्षी, वन्यप्राणी हे मानवी वस्त्यांकडे वळू लागले आहेत.

गावठाणांच्या आजूबाजूला असणार्‍या ओढ्या-नाल्यांना तसेच शिवारातील काही भागात प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय होत आहे. मात्र, अन्नाची कमतरता भासत आहे. त्यातही अनेक वन्यप्राणी हे रस्त्यांवर वाहनांना धडकून किंवा भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात बळी जात आहेत. त्यामुळे वन विभागासह पशुपक्षी, वन्यजीवप्रेमींनी पुढाकार घेत अन्न-पाण्याची सोय करण्याची गरज निर्माण झाली आहे.

भोर तालुक्याच्या जंगल भागाला खासगी रानातून वणवे लावले जात आहेत. वणवे लावणार्‍यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. ज्या भागात पाण्याची कमतरता आहे त्या ठिकाणी पाणीपुरवठा केला जाणार आहे. वणव्याच्या भीतीने, तसेच अन्न-पाण्याच्या शोधात जंगलातील पशुपक्षी, वन्यप्राणी मानवी वस्त्यांकडे धाव घेत आहेत. नागरिकांनी शक्य असल्यास आपल्या परिसरात अन्न-पाण्याची सोय करावी.

शिवाजी राऊत, वनपरिक्षेत्र अधिकारी, भोर.

हेही वाचा

Back to top button