ओडिशा : जगन्नाथ मंदिरात बांगलादेशी नागरिकांचा प्रवेश, पोलिसांकडून ९ जण ताब्यात | पुढारी

ओडिशा : जगन्नाथ मंदिरात बांगलादेशी नागरिकांचा प्रवेश, पोलिसांकडून ९ जण ताब्यात

पुढारी ऑनलाईन ; जगन्नाथ मंदिरात बांगलादेशी नागरिकांचा प्रवेश केल्‍याची घटना समाेर आली आहे. या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या बांगलादेशींचे पासपोर्ट तपासले जात असल्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षकांनी सांगितले. यातील एक हिंदू असल्याचे निष्पन्न झाले आहे. इतर पासपोर्टचीही चौकशी सुरू आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की, पुरीच्या जगन्नाथ मंदिरात अनधिकृत प्रवेश करण्याच्या आरोपाप्रकरणी ओडिशा पोलिसांनी ९ बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. एका अधिकार्‍याने सांगितले की, रविवारी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी काही बांगलादेशी नागरिकांना मंदिरात जाताना पाहिले. त्‍यांनी सिंहद्वार पोलिस स्‍टेशनला या विषयीची तक्रार दाखल केली. त्‍यानंतर पोलिसांनी बांगलादेशी नागरिकांना ताब्‍यात घेतले.

पुरीचे अतिरिक्‍त पोलिस अधिक्षक सुशील मिश्र यांनी सांगितले की, आम्‍हाला तक्रार मिळाली की काही बिगर हिंदू बांगलादेशींनी मंदिरात प्रवेश केला आहे. आम्‍ही बांगलादेशी नागरिकांना ताब्‍यात घेतले आहे. त्‍यांच्याकडून चौकशी सुरू आहे. मंदिराच्या नियमानुसार फक्‍त हिंदू लोकांनाच या मंदिरात प्रवेश मिळू शकतो. जर गैर हिंदू व्यक्‍ती या मंदिरात प्रवेश करतो तर अशा व्यक्‍तीवर कारवाई केली जाते.
पोलिसांच्या माहितीनुसार, ताब्‍यात घेतलेल्‍या ९ बांगलादेशी नागरिकांचे पासपोर्ट तपासले जात आहेत. या दरम्‍यान यातील एक व्यक्‍ती हिंदू असल्‍याचे समोर आले आहे. अन्य पासपोर्ट्सची तपासणी केली जात आहे. प्राथमिक तपासानुसार ९ पैकी चार लोकांनी मंदिरात प्रवेश केल्‍याचे समोर आले आहे.

हेही वाचा :

Back to top button