पुण्यात मागील तीन वर्षांत 71 हजार वाहनांची पुनर्नोंदणी | पुढारी

पुण्यात मागील तीन वर्षांत 71 हजार वाहनांची पुनर्नोंदणी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : गेल्या तीन वर्षांत पुण्यातील आयुर्मान संपलेल्या 71 हजार 814 वाहनांची पुनर्नोंदणी केली आहे. पुनर्नोंदणीनंतर या गाड्या पुन्हा रस्त्यावर सक्षमपणे धावत आहेत, तर पुणे आरटीओने याच तीन वर्षांत 1471 वाहने स्क्रॅप केली आहेत. यावरून पुण्यात वाहनांच्या पुनर्नोंदणीचे प्रमाण अधिक असून, वाहने स्क्रॅप करण्याचे प्रमाण कमी असल्याचे दिसते. राज्यातील आरटीओ कार्यालयांमार्फत आयुर्मान संपलेली वाहने स्क्रॅप करणे, त्यांची पुनर्नोंदणी करून ती रस्त्यावर धावण्यास सक्षम आहेत की नाही, याची तपासणी केली जाते. अशी कार्यवाही पुणे आरटीओकडून करण्यात आली असून, जानेवारी 2021 ते डिसेंबर 2023 या तीन वर्षांच्या कालावधीत 71 हजार 814 वाहनांची पुनर्नोंदणी केल्याचे समोर आले आहे.

1 लाख 8 हजार वाहनांची पुनर्नोंदणी बाकी

पुणे शहरात आत्तापर्यंत 71 हजार वाहनचालकांनी आपल्या आयुर्मान संपलेल्या वाहनाची पुनर्नोंदणी केली असली तरी अजूनही 1 लाख 8 हजार वाहनचालक आपल्या वाहनाची पुनर्नोंदणी न करताच वाहने पळवत असल्याचे आरटीओच्या पाहणीत समोर आले आहे. या वाहनचालकांनी एकतर आपले वाहन स्क्रॅप करावे; अन्यथा आळंदी रोड येथील कार्यालयात वाहनाची पुनर्नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आरटीओकडून सांगण्यात आले. तसेच, या वाहनचालकांच्या आठवणीकरिता त्यांच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर आरटीओकडून आठवणीसाठी मेसेज पाठविण्यात येत आहेत, असेही आरटीओकडून सांगण्यात आले.

अशी झाली वाहनांची पुनर्नोंदणी…

सन/साल               – पुनर्नोंदणी स्क्रॅप

  • 1 जाने. ते डिसें. 2021  22 हजार 837 560
  • 1 जाने. ते डिसें. 2022  24 हजार 617 515
  • 1 जाने. ते डिसें. 2023  24 हजार 360 390
  • पुनर्नोंदणी झालेली एकूण वाहने – 71 हजार 814
  • स्क्रॅप झालेली एकूण वाहने -1 हजार 471

वाहन पुनर्नोंदणीसाठी किती फी?

  • वाहन पुनर्नोंदणी फी; दुचाकीसाठी 1 हजार रुपये, चारचाकीसाठी 5 हजार रुपये
  • वाहन तपासणी फी; दुचाकीसाठी 400 रुपये, चारचाकीसाठी 800 रुपये
  • स्मार्ट कार्डसाठी फी; दुचाकी आणि चारचाकीसाठी 200 रुपये
  • घरपोच करण्यासाठी पोस्टाची फी – दोन्हींसाठी 58 रुपये
  • याव्यतिरिक्त पर्यावरण कर, इन्शुरन्स, पीयूसीसाठी लागणारे पैसे

ज्या वाहनचालकांनी आपल्या वाहनाचे री-रजिस्ट्रेशन (वाहनाची पुनर्नोंदणी) प्रक्रिया केलेली नाही, ग्रीन टॅक्स भरलेला नाही, अशा वाहनचालकांनी ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी; अन्यथा अशा वाहनांवर कारवाई केली जाणार आहे.

– संजीव भोर, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

हेही वाचा

Back to top button