‘मविआ’मध्ये ‘वंचित’ आवश्यक : शरद पवार

‘मविआ’मध्ये ‘वंचित’ आवश्यक : शरद पवार

बारामती : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय समाज पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीत सोबत आल्यास त्यांना राज्यातील एक महत्त्वाची जागा देता येईल, असे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार म्हणाले. बारामतीतील गोविंदबागेत त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चेत हे मत व्यक्त केले. खा. पवार म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतले पाहिजे, ही माझी वैयक्तिक इच्छा आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर सोबत आल्यास त्यांना महत्त्वाची जागा देऊ, असे त्यांनी सांगितले. जानकर यांच्याशी याबाबत चर्चा झाली असून, त्यांना सोबत घेण्यास मी आग्रही असल्याचेही ते म्हणाले.

शरद पवार यांनी प्रकाश आंबेडकर यांचा राज्यातील जनसंपर्क व प्रत्येक विधानसभा मतदारसंघात त्यांची असलेली ताकद, याविषयीदेखील सकारात्मक मत व्यक्त केले. त्यांनी 27 जागांची मागणी केलेली नसून सहा जागा मागितल्या आहेत, यात आमच्या कार्यकर्त्यांचा आणि माध्यमांचा गैरसमज झाला असल्याचे पवार म्हणाले. महाविकास आघाडीच्या लोकसभेसाठीच्या जागा वाटपाचे सूत्र आता अंतिम टप्प्यात आले असून, 6 व 7 मार्च रोजी मुंबईत यासंदर्भातील बैठक आहे, अशी माहिती त्यांनी दिली. शिवसेनेचे पक्षप्रमुख
उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या जागा वाटपाचे सूत्र ठरेल, असे ते म्हणाले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news