एका मिल्क शेकसाठी 60 हजार रुपये दंड! | पुढारी

एका मिल्क शेकसाठी 60 हजार रुपये दंड!

बंगळूर : फ्लाईटमधील प्रवाशाला एक्स्पायरी डेट संपलेला मिल्क शेक दिल्याबद्दल विमान कंपनीला चक्क 60 हजार रुपयांचा दंड सोसावा लागला आहे. एक्स्पायरी डेट संपलेल्या मिल्क शेकमुळे तब्येत बिघडल्यानंतर सदर व्यक्तीने याची ग्राहक न्यायालयात तक्रार केली आणि न्यायालयाने 60 हजार रुपयांची नुकसान भरपाई त्या प्रवाशाला करावी, असे आदेश सदर कंपनीला दिले.

दक्षिण बंगळूरचे एन श्रीनिवासमूर्ती हे एका खासगी विमानाने दुबईहून मुंबईला जात होते. त्यांनी मिल्क शेक घेतला. नंतर त्यांनी मिल्क शेकच्या पॅकेटवर पाहिले की, त्याची एक्स्पायरी डेट संपलेली होती. नंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. यातून उलटी सुरू झाली. श्रीनिवासमूर्ती यांच्या म्हणण्यानुसार, आजारपणामुळे ते आठवडाभर कुठेही बाहेर जाऊ शकले नाहीत. त्यांचा हिरव्या मिरचीचा व्यवसाय असून, प्रवास न केल्यामुळे त्यांचे नुकसान झाले. त्यानंतर त्यांनी विमान कंपनीविरोधात तक्रार दाखल केली आणि नुकसानीपोटी एक लाख रुपये, वैद्यकीय खर्चापोटी नऊ लाख रुपये, हिरवी मिरची खराब झाल्याबद्दल 22.1लाख रुपये आणि प्रवास खर्चापोटी 50 हजार रुपये यासह इतर मदत देण्याची मागणी केली.

22 जानेवारी रोजी आपल्या आदेशात न्यायालयाने विमान कंपनीला खराब सेवेसाठी 25,000 रुपये, मानसिक त्रासासाठी 25,000 रुपये आणि खटल्याच्या खर्चासाठी 10,000 रुपये देण्याचे निर्देश दिले. एका मिल्क शेकचे हे प्रकरण त्या विमान कंपनीवर मात्र बरेच महागडे ठरल्याचे यामुळे स्पष्ट झाले.

Back to top button