आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपने किमान 370 जागांचे लक्ष्य नजरेसमोर ठेवले असून, ठिकठिकाणी 'अबकी बार फिर मोदी सरकार' अशा घोषणा दिल्या जात आहेत. विजयाची हॅटट्रिक होण्याबाबत भाजपप्रणीत एनडीए आघाडीला संपूर्ण आत्मविश्वास असून, इंडिया आघाडी मात्र विस्कटत चालल्याचे दिसते. निवडणुकांना तोंड देण्याची इंडिया आघाडीची तयारी अद्याप पूर्ण झाली नसून, वाटाघाटींचे गुर्हाळ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, एनडीए आघाडीत मात्र एकोपा दिसत असून, आमची आघाडी 'चारसौ' पार करेल, असा दावा केला जात आहे. इंडिया आघाडीत विस्कळीतपणा व नैराश्य दिसते, तर एनडीए आघाडीत एकजूट आणि जोश. 2024 च्या निवडणुकीची तयारी भाजपने जवळपास दोन वर्षे अगोदरपासून सुरू केली आहे आणि ज्या ठिकाणी पक्षाला कधीही विजय मिळाला नाही वा जेथे पक्ष दुसर्या क्रमांकावर होता, असे मतदारसंघ निश्चित करून, त्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. केंद्रीय मंत्र्यांना विविध मतदारसंघांची जबाबदारी देऊन दौरे करण्यास सांगण्यात आले.
ज्या राज्यात भाजपची स्थिती बिकट आहे, तेथे स्थानिक पक्षांना बरोबर घेणे, आवश्यक असेल तेथे प्रादेशिक पक्षांत फूट घडवणे वा काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षातील बड्या नेत्यांना आपल्याकडे खेचून घेणे, या सर्व क्लृप्त्या आजमावण्यात आल्या. एखाद्या कंपनीच्या व्यावसायिक पद्धतीप्रमाणे भाजपचे व्यवस्थापन केले जाते. प्रत्येक खासदाराचे परफॉर्मन्स ऑडिट केले जाते, सर्व्हे केले जातात. मतदारांची व कार्यकर्त्यांची त्याच्याबद्दल असलेली मते जणून घेतली जातात आणि मगच त्या उमेदवारास पुन्हा संधी द्यायची की नाही, हे ठरवले जाते. आता लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने 16 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत 34 मंत्री व दोन माजी मुख्यमंत्री यांचा समावेश असून, 57 ओबीसी उमेदवारांचा व 28 महिलांचा समावेश आहे. ओबीसी हा भाजपचा डीएनए आहे, असे उद्गार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा काढले आहेत, त्याची प्रचीती या यादीवरूनही येते.
महिला आरक्षणाचे विधेयक संसदेत मंजूर करण्याचे दमदार पाऊल केंद्र सरकारने उचलले असून, स्त्रियांसाठी 'उज्ज्वला'सारख्या अनेक कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. अन्य पक्षांच्या तुलनेत अलीकडील काळात भाजपने स्त्रियांना संसदेत अधिक संधी दिली आहे; परंतु प्रज्ञा सिंह यांच्यासारख्या कट्टरवादी खासदाराचे तिकीट कापले आहे. नथुराम गोडसे हा देशभक्त होता, असे वादग्रस्त उद्गार त्यांनी काढले होते आणि त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तीव्र शब्दांत नाराजी प्रकट केली होती. त्यानंतर प्रज्ञा सिंह यांना संरक्षण खात्याशी संलग्न असलेल्या समितीतूनही बडतर्फ करण्यात आले. सलग दोनवेळा नवी दिल्लीतून निवडून आलेल्या आणि परराष्ट्र राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळणार्या मीनाक्षी लेखी यांचेही तिकीट कापले आहे. मंत्री म्हणून त्यांची कामगिरी चमकदार नव्हती. उलट नवी दिल्लीतून भाजपच्या ज्येष्ठ नेत्या दिवंगत सुषमा स्वराज यांची कन्या बाँसुरी स्वराज यांना पहिल्यांदा संधी दिली आहे.
वाराणसीमधून मोदी पुन्हा निवडणूक लढवणार असून, वाराणसीमध्ये त्यांनी गतवर्षी काशी-तमीळ संगम हा नावीन्यपूर्ण उपक्रम आयोजित केला होता. वाराणसीत 19 हजार कोटी रुपयांचे अनेक विकास प्रकल्प राबवले जात असून, शहराचा चेहरामोहरा बदलत आहे, तर अमित शहा हे गांधीनगरमधून निवडणूक लढवणार आहेत. पक्षाच्या आतापर्यंतच्या यशात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना तिकीट नाकारले जाईल, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या; परंतु तसे घडलेले नाही. संरक्षणमंत्री म्हणून त्यांची कामगिरी उत्तम असून, या क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूक आकर्षित करणे, तसेच लष्कराचे आधुनिकीकरण करणे, यांवर त्यांचा भर राहिला आहे. अमेठीतून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या पुन्हा निवडणूक लढवणार असून, आपल्याविरुद्ध राहुल गांधी यांनी निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हानच त्यांनी दिले आहे.
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची निवड पुन्हा मुख्यमंत्रिपदी न झाल्यामुळे ते बंडखोरी करतील, असे विरोधकांना वाटत होते; परंतु शिवराजसिंह हे पक्षातील एक निष्ठावंत नेते असून, आता विदिशा या त्यांच्या पारंपरिक मतदारसंघातूनच त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली गेली आहे. दक्षिण दिल्लीतील भाजपचे खासदार रमेश बिधुडी यांचे नाव गाळले आहे. गेल्या वर्षी त्यांनी बसपा खासदार दानिश अली यांच्याविरुद्ध सभागृहात वादग्रस्त टिप्पणी केली होती. त्याची शिक्षा त्यांना मिळालेली दिसते! मात्र काँग्रेसमधून भाजपत आलेले कृपाशंकर सिंह यांना जौनपूरमधून तिकीट दिले आहे. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात त्यांच्यावर कारवाई करावी, अशी भाजपने पूर्वीच मागणी केली होती; परंतु 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्याविरुद्धच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे थंडावली, हे मतदारांच्या नजरेतून सुटलेले नाही. अर्थात, कृपाशंकर यांना मुंबईतील राजकारणातून बाहेर काढले आहे, हे मात्र खरे.
भाजपच्या या यादीवर नजर टाकली, तर त्यात सातत्यही दिसते आणि बदलही दिसतो. उमेदवार निवडून येण्याची शक्यता किती आहे, तो पक्षासाठी काम करत आहे का आणि तो कोणत्या सामाजिक वर्गातला आहे, अशा अनेक मुद्द्यांचा भाजपने विचार केला आहे. ओबीसी आणि मागास वर्गातील लोकांना पक्षाने उत्तम प्रतिनिधित्व दिले आहे. शिवाय या पहिल्या यादीत 47 उमेदवार हे पन्नाशीच्या आतले आहेत. संपूर्ण यादीवर नजर टाकली तरी महिला, तरुण, शेतकरी आणि गरिबांचे महत्त्व पक्षाने अधोरेखित केल्याचे दिसते. छत्तीसगडमधील नऊपैकी सात नवे उमेदवार दिले आहेत, तर उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशातील अगोदरचे बहुतेक उमेदवार कायम ठेवले आहेत. भाजप हा कठोर शिस्तीने चालणारा, कार्यक्षम पक्ष आहे. एकूण आपण 'सब का साथ, सब का विकास, सब का विश्वास' या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करत आहोत, असाच संदेश पक्षाने दिला आहे.