Kolhapur : शिवाजी मंडळाने पटकाविला के.एम. चषक | पुढारी

Kolhapur : शिवाजी मंडळाने पटकाविला के.एम. चषक

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : हजारो फुटबॉलप्रेमींच्या गर्दीने खचाखच भरलेल्या छत्रपती शाहू स्टेडियमवर अखेरच्या क्षणापर्यंत अटीतटीने रंगलेल्या चुरशीच्या अंतिम सामन्यात शिवाजी तरुण मंडळाने यजमान खंडोबा तालीम मंडळाचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव करून स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले.

शिवाजी पेठेतील खंडोबा तालीम मंडळाच्या 111 व्या वर्धापन दिनानिमित्त यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली के. एम. चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन छत्रपती शाहू स्टेडियमवर प्रतिवर्षीप्रमाणे करण्यात आले होते. रविवारी स्पर्धेतील अंतिम सामना शिवाजी मंडळ विरुद्ध खंडोबा तालीम यांच्यात रंगला. अंतिम सामन्याचे उद्घाटन ‘केएसए’चे चीफ पेट्रन शाहू महाराज, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश पाटील, समरजितसिंह घाटगे, डॉ. चेतन नरके, संदीप नरके, पृथ्वीराज महाडिक, विश्वराज महाडिक, कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते झाले.

अंतिम सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांकडून जलद खेळाचा अवलंब करण्यात आला. सामन्याच्या तिसर्‍या मिनिटाला शिवाजी तरुण मंडळाच्या योगेश कदम याने उत्कृष्ट गोल नोंदवत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर त्यांच्या खुर्शीद अली याने डाव्या पायाने मारलेला फटका ‘खंडोबा’चा गोलरक्षक अर्णेंदू दत्ता याने रोखला. यानंतर ‘खंडोबा’च्या कुणाल दळवीने केलेला प्रयत्न अपयशी ठरला. पाठोपाठ केवळ कांबळेच्या पासवर सुधीर कोटीकोलाने हेडद्वारे केलेला प्रयत्न थोडक्यात हुकला. ‘शिवाजी’कडून रोहन आडनाईकने मारलेली फ्री किक गोली अर्णेंदू दत्ता याने पंच करून बाहेर काढली. सामन्याच्या मध्यंतरापर्यंत शिवाजी मंडळ 1-0 गोलने आघाडीवर होते.

उत्तरार्धात दोन्ही संघांकडून गोलसाठी प्रयत्न सुरूच होते. 56 व्या मिनिटाला ‘शिवाजी’कडून झालेल्या चढाईत सिद्धेश साळोखेच्या पासवर करण चव्हाण-बंदरे याने गोल नोंदवत संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर संदेश कासारच्या पासवर करण चव्हाणचा उत्कृष्ट प्रयत्न थोडक्यात हुकला. सामन्याच्या शेवटच्या मिनिटाला (80) खंडोबा तालीम मंडळाच्या प्रतीक सावंत याने एका गोलची परतफेड केली. पाच मिनिटांच्या जादा वेळेत दुसर्‍या गोलची परतफेड ‘खंडोबा’कडून न झाल्याने सामना शिवाजी मंडळाने 2-1 असा जिंकत केएम चषक पटकाविला.

अंतिम सामना पाहण्यासाठी स्टेडियम फुटबॉलप्रेमींनी गर्दीने खचाखच भरले होते. यात महिलांसह लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता.

बक्षीस वितरण ‘केएसए’चे पेट्रन इन चिफ शाहू महाराज, पालकमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ‘केएसए’चे अध्यक्ष मालोजीराजे, खासदार धनंजय महाडिक, विजयकुमार देशमुख, पृथ्वीराज महाडिक, विश्वराज महाडिक, कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त शिवाजी पाटील, भाजपचे राहुल चिकोडे, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे, खंडोबा तालमीचे राजेंद्र चव्हाण, युवराज बचाटे व खंडोबा तालीम मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
संपूर्ण सामन्याचे धावते वर्णन निवेदक विजय साळोखे यांनी केले. त्यांचा गौरव खा. धनंजय महाडिक यांच्या हस्ते 10 हजार रुपये देऊन करण्यात आला.

परिसरातील रस्त्यांना वाहनतळाचे स्वरूप

अंतिम सामना पाहण्यासाठी फुटबॉलप्रेमींनी स्टेडियममध्ये प्रचंड गर्दी केली होती. यामुळे दुपारी 1 ते सायंकाळी 7 यावेळेत परिसरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. छत्रपती शाहू स्टेडियम व छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या सभोवतालच्या रस्त्यांवर दुचाकी वाहने पार्क करण्यात आली होती. यामुळे संपूर्ण परिसराला वाहनतळाचे स्वरूप प्राप्त झाले होते. रविवार असल्याने शहरात पर्यटकांचीही ये-जा सुरू होती. वाहतूक पोलिसांनी पर्यटकांना बिंदू चौक, रंकाळा तलाव, ताराबाई रोड, दुधाळी मैदानमार्गे पाठविले.

बक्षिसांचा वर्षाव…

विजेता : शिवाजी तरुण मंडळ – 2 लाख व के.एम. चषक
उपविजेता : खंडोबा तालीम मंडळ – 1 लाख व चषक
उपांत्य फेरीतील पराभूत संघ : बालगोपाल तालीम व सम—ाट नगर स्पोर्टस् – प्रत्येकी 25 हजार रुपये.

मालिकावीर : योगेश कदम (शिवाजी मंडळ ) – 20 हजार रुपये व 42 इंची एलईडी टीव्ही
उत्कृष खेळाडू : (प्रत्येकी 10 हजार व 42 इंची एलईडी टीव्ही), गोलकीपर – अर्णेंदू दत्ता (खंडोबा तालीम), डिफेन्स : आदित्य लायकर (खंडोबा तालीम), हाफ : कुणाल दळवी (खंडोबा तालीम), फॉरवर्ड : करण चव्हाण- बंदरे (शिवाजी मंडळ).
सामनावीर : संदेश कासार (शिवाजी मंडळ), लढवय्या – संकेत जरग (खंडोबा तालीम).
महिलांना 5 पैठणी साड्या देऊन सन्मान / लकी ड्रॉमधून फुटबॉलप्रेमींना गिफ्ट कूपन.

Back to top button