उत्पादन शुल्क विभाग ‘अ‍ॅक्टिव्ह मोड’वर ! | पुढारी

उत्पादन शुल्क विभाग ‘अ‍ॅक्टिव्ह मोड’वर !

पुणे : पुढारी वृत्तसेवा : आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभाग अ‍ॅक्टिव्ह मोडवर आला आहे. अवैध दारूनिर्मिती, वाहतूक व विक्रीवर आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोहीम हाती घेतली आहे. त्यामध्ये गेल्या दोन महिन्यांत 2 कोटी 81 लाख 91 हजार 349 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने 1 जानेवारी ते 26 फेब्रुवारी या कालावधीत अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. त्यात 426 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून, 411 आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत 20 हजार 675 लिटर गावठी हातभट्टी दारू, 761 लिटर देशी मद्य, 18 हजार 295 लिटर विदेशी मद्य, 138 लिटर बिअर व 1 हजार 823 लिटर ताडीसह 36 वाहने, असा 2 कोटी 81 लाख 91 हजार 349 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

बेकायदा दारू विक्री करणार्‍यांविरोधात एमपीडीए कायद्यांतर्गत पोलिस कारवाई केली जात असून, त्यामध्ये दाखल 48 प्रकरणांत पोलिस आयुक्तालयाकडून कारवाई करून 10 आरोपींविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली. किरकोळ मद्य विक्री करणार्‍या (एफएल-3) 249 परनावाधारक दुकानादारांनी नियमभंग केला आहे. त्यातील 3 परवाने निलंबित करण्यात आले आहेत तसेच 44 लाख 90 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. 44 बिअर/वाईन शॉपी (एफएलबीआर-2) चालकांनी नियमभंग केला असून, त्यातील 15 परवाने निलंबित करण्यात आले आहेत. 7 लाख 30 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, 4 आरोपींचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे. किरकोळ अनुज्ञप्ती कक्षाबाहेरील तसेच रूफ टॉपविरुद्ध 34 नियमबाह्य प्रकरणांत कारवाई केलेली असून 17 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

14 नियमित व 3 विशेष पथके

अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक व विक्री तसेच परराज्यांतील मद्य, अवैध ताडी आदींची विक्री, ढाब्यांवर अवैध मद्याची विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाने एकूण 14 नियमित व 3 विशेष पथके तयार केली आहेत. ठिकठिकाणी तपासणी नाके उभारण्यात येणार आहेत. राज्याचा महसूल चुकवून परराज्यांतून येणार्‍या मद्यसाठ्यावर तसेच किरकोळ अनुज्ञप्तीचे व्यवहार विहित वेळेत चालू नसल्यास व काहीही आक्षेपार्ह आढळून आल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे. – चरणसिंह राजपूत,
अधीक्षक, उत्पादन शुल्क विभाग, पुणे

…येथे करा तक्रार

नागरिकांना अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक व विक्रीबाबत माहिती मिळाल्यास टोल फ—ी क्र. 1800233999 किंवा दूरध्वनी क्र. 020-26058633 यावर संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक सी. बी. राजपूत यांनी केले आहे.

हेही वाचा

Back to top button