अभिजात दर्जासाठी ताकदीने प्रयत्न : राज्य सरकारच्या समितीतील सदस्यांची ग्वाही | पुढारी

अभिजात दर्जासाठी ताकदीने प्रयत्न : राज्य सरकारच्या समितीतील सदस्यांची ग्वाही

सुवर्णा चव्हाण

पुणे : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून लढा सुरूच आहे… आता तर राज्य सरकारने केंद्राकडे पाठपुरावा करण्यासाठी एक समिती गठित केली आहे… पण, या समितीने काय होणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. परंतु, दुसरीकडे केंद्राकडे पाठपुरावा करण्यासाठी अशा समितीची आवश्यकता होती. या समितीद्वारे मराठीला अभिजात दर्जा मिळण्यात कोणत्या अडचणी येत आहेत, या अडचणींचा अभ्यास करून हा विषय आणखी ताकदीने केंद्राकडे मांडता येईल, असे समितीतील सदस्यांचे म्हणणे आहे. समितीची पहिली बैठक लवकरच होणार असून, यात पुढील दिशा ठरविली जाईल, असेही सदस्यांनी सांगितले.

दरम्यान, सदस्यांची ऑनलाईन बैठक बुधवारी (दि.28) होणार आहे. समितीच्या अध्यक्षपदी माजी प्रशासकीय अधिकारी ज्ञानेश्वर मुळे यांची, तर सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार यांची सदस्यपदी नियुक्ती केली आहे. मराठी भाषा विभागाने नुकताच याबाबतचा सरकारी आदेश काढला. या समितीचे राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख आणि राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित हेही सदस्य असतील.

समितीच्या माध्यमातून मराठीला अभिजात दर्जा मिळावा, हा विषय केंद्र पातळीवर प्रभावीपणे मांडता येईल, असे वाटते. समितीची पहिली बैठक झाल्यावर कामाचे स्वरूप ठरणार आहे, बैठकीत चर्चा होऊन पुढील दिशा ठरविली जाईल.

– लक्ष्मीकांत देशमुख, अध्यक्ष, भाषा सल्लागार समिती

मराठीला अभिजात दर्जा मिळवण्यामध्ये आम्ही समितीच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोतच. ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे हा दर्जा मिळवण्यासंदर्भात कोणत्या अडचणी येत आहेत, याचा पहिल्यांदा अभ्यास केला जाईल आणि त्याप्रमाणे चर्चा होऊन पुढील दिशा ठरविली जाईल. मराठीला हा दर्जा मिळायलाच हवा. त्यासाठी राजकीय पातळीवरही प्रयत्न झाले पाहिजेत, पक्षीय राजकारण बाजूला ठेवून प्रयत्न केल्यास हे होऊ शकते.

– संजय नहार, अध्यक्ष, सरहद संस्था

मराठीला अभिजात दर्जा मिळावा, हा विषय आणखी ताकदीने केंद्र पातळीवर मांडला जावा आणि केंद्र सरकारकडे याविषयी सातत्याने पाठपुरावा व्हावा, यासाठी राज्य सरकारने पाठपुरावा समिती स्थापन केली आहे. त्यामुळे या विषयाबाबत पाठपुरावा करणे सोयीचे जाणार आहे. या समितीचा एक भाग म्हणून असे वाटते की, आम्ही समितीच्या माध्यमातून नक्कीच ताकदीने हा विषय केंद्राकडे मांडू आणि मराठीला अभिजात दर्जा मिळवून देऊ. मराठी ही काळाप्रमाणे आणि वाङ्मयीन समृद्धीच्या बाबतही अभिजात आहे, हे अहवालानुसार सिद्धही झाले आहे. याची पद्धतशीर मांडणी झाली आहे, या मांडणीच्या आधारे आमची समिती पाठपुरावा करेल.

– डॉ. राजा दीक्षित, अध्यक्ष, राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ

हेही वाचा

Back to top button