सीएसआर निधीमुळे सामाजिक संस्थांना आर्थिक बळ : उपक्रमांना गती

सीएसआर निधीमुळे सामाजिक संस्थांना आर्थिक बळ : उपक्रमांना गती

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी विविध कंपन्यांकडून विशेष निधी सामाजिक संस्थांना दिला जात आहे. या निधीमुळे सामाजिक संस्थांना काम करण्यास आर्थिक बळ मिळाले असून, निधीद्वारे अनेक संस्था ताकदीने सामाजिक उपक्रम राबवू लागल्या आहेत. राज्यातील मुंबई असो वा पुणे… कोल्हापूर असो वा सातारा… अशा विविध जिल्ह्यांमध्ये कार्यरत असणार्‍या संस्थांना सीएसआर निधी मिळत आहे. पुण्यात अंदाजे 70 हजारांहून अधिक सामाजिक संस्था असून, त्यातील बहुतांश संस्थांना हा निधी मिळत असून, सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबविण्यासाठी संस्थांना या निधीचा उपयोग होत आहे. त्यामुळे गेल्या सात ते आठ वर्षांत संस्थांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत झाली आहे आणि निधीमुळे ग्रामीण भागांतही अनेक प्रकल्प सुरू केले आहेत.

पूर्वी संस्थांना देणग्यांवरच सामाजिक उपक्रम राबवावा लागत असे… पण, काळाप्रमाणे चित्र बदलले असून, आयटी क्षेत्रातील कंपन्या असो वा बांधकाम क्षेत्रातील कंपन्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिब्लिटी फंड) संस्थांना विशेष निधी सामाजिक उपक्रमांसाठी दिला जात आहे. देहविक्री करणार्‍या महिलांसाठी काम करणार्‍या संस्था असो वा रस्त्यावरील मुलांच्या शिक्षणासाठी काम करणार्‍या संस्था… या निधीचा उपयोग संस्थांना होत आहे. मंगळवारी (दि.27) साजरा होणार्‍या जागतिक स्वयंसेवी संस्था दिनानिमित्त दै. 'पुढारी'ने याबाबत जाणून घेतले. सहेली सेवा संघाच्या तेजस्वी सेवेकरी म्हणाल्या, सीएसआर निधी हे सामाजिक संस्थांसाठी खूप महत्त्वाचे आहे. सीएसआर निधीमुळे आम्हाला विविध उपक्रम राबविण्यासाठी मोठी मदत झाली आहे. त्यामुळे आम्ही देहविक्री करणार्‍या महिलांसाठी आम्ही वेगवेगळे प्रकल्प राबवत आहोत. महिलांच्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च, महिलांना व्होकेशनल ट्रेनिंग देणे असेही उपक्रम राबविता येत आहेत. या निधीमुळे संस्था आर्थिकदृष्ट्या भक्कम बनल्या आहेत. निधी हा टप्प्या- टप्प्याने दिला जातो.

सीएसआर फंडिंग म्हणजे काय ?

सीएसआर म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिब्लिटी फंड. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी कंपन्यांकडून जो निधी सामाजिक संस्थांना दिला जातो त्या निधीला सीएसआर निधी असे म्हटले जाते. भारतामध्ये कार्यरत असणार्‍या सर्व कंपन्यांना एक ठरावीक निधी द्यावा लागतो. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारकडून विशेष असे नियम व काही अटी घालून देण्यात आल्या आहेत. कंपनीला उपक्रमासाठी सीएसआर निधी देणे अनिवार्य आहे.

सामाजिक संस्थांसाठी आताच्या घडीला विविध कंपन्यांकडून मिळणारे सीएसआर निधी खूप आवश्यक आहे. त्यामुळे संस्थांना सामाजिक उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी आर्थिक बळ मिळाले आहे. या निधीचा उपयोग संस्थांना नक्कीच होत आहे. परंतु, असे असले तरी छोट्या संस्थांना निधीसाठी कंपन्यांपर्यंत पोहोचणे अडचणी जाते. छोट्या संस्थांपर्यंतही कंपन्यांनी पोहोचले पाहिजे.

– मीना कुर्लेकर, कार्यवाह, वंचित विकास संस्था

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news