Railway News | रेल्वेचे जाळे अधिक विस्तारणार : रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील | पुढारी

Railway News | रेल्वेचे जाळे अधिक विस्तारणार : रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील

नाशिक (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 नंतरच्या भारताच्या विकासाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून वाटचाल सुरू ठेवलेली आहे. गतिमान भारत योजनेमुळे रखडलेले सर्व प्रकल्प वेगाने पूर्ण होत असून, रेल्वेच्या उत्पादनात आणि उत्पन्नात दिवसेंदिवस वाढ होत आहे. देशभर रेल्वेचे जाळे अधिक विस्तारणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी देवळाली कॅम्प येथे आयोजित कार्यक्रमप्रसंगी केले

अमृत भारत स्टेशन विकास योजने (Amrit Bharat Station yojana 2024) अंतर्गत पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते व रेल्वे राज्यमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत 554 रेल्वेस्थानके, तर 1500 रोड ओव्हर ब्रिज, अंडरपास शिलान्यास समारंभ ऑनलाइन पद्धतीने करण्यात आला. कार्यक्रमास 20 राज्यांचे राज्यपाल, 11 मुख्यमंत्री, 8 उपमुख्यमंत्री, 145 मंत्री, 590 खासदार, 1196 आमदारांसह 40 लाख लोकांनी सहभाग नोंदविला.

देवळाली येथे भुसावळ मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमप्रसंगी रेल्वे प्रबंधक इती पांडे, खासदार हेमंत गोडसे, लक्ष्मण सावजी, सुनील बच्छाव, सचिन ठाकरे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. दानवे म्हणाले की, गतिमान भारत योजनेमुळे रखडलेले सर्व प्रकल्प पूर्ण करण्याकडे कल असून, रेल्वेच्या उत्पादनात दिवसेंदिवस वाढ होत आहे. विकसित भारत या संकल्पनेमुळे दोन वर्षांत प्रकल्प पूर्ण केले जात आहेत. अनेक अवघड ठिकाणी रेल्वे मार्गाचे जाळे पसरविण्यात आले असून, बुलेट ट्रेनच्या माध्यमातूनही रेल्वेची गतिमानता वाढविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. फाटकविरहित रेल्वे करण्याकडे मोठा कल असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गत 10 वर्षांत रेल्वेचा विकास ज्या पद्धतीने होत आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय रेल्वे आपला ठसा उमटवत असल्याचेही त्यांनी सांगितले. (Amrit Bharat Station yojana 2024)

भुसावळ मंडलाच्या प्रबंधक इती पांडे यांनी या विभागातील रेल्वेच्या विकासाचा आढावा सादर केला. सहायक प्रबंधक सुनीलकुमार सुमन, सीनियर डीसीएम अजय कुमार, स्टेशन प्रबंधक आर. के. कुठार यांनी स्वागत केले. प्रारंभी ‘२०४७ का विकास भारत रेल्वे’ या विषयावर आयोजित निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. (Amrit Bharat Station yojana 2024)

दे‌वळाली : रेल्वेसंदर्भात निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हा सरचिटणीस रतन चावला, रवींद्र भदाणे व इतर. (छाया : सुधाकर गोडसे)

आंदोलन रोखण्यासाठी बंदोबस्त
काही संघटनांकडून मंत्र्यांना काळे झेंडे दाखविले जाणार असल्याने सुरक्षिततेचा उपाय म्हणून रेल्वे सुरक्षा दल व देवळाली कॅम्प पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

सर्व २२ गाड्यांना थांब्याची मागणी
देवळाली रेल्वे स्थानकात कोरोना काळाआधी 22 प्रवासी रेल्वे गाड्या थांबत असत, मात्र सध्या केवळ चार गाड्यांना थांबा देण्यात आला असून, पूर्वीप्रमाणे सर्वच गाड्यांना येथे थांबा देणे, बेलतगव्हाण येथे उड्डाणपुलाची निर्मिती आदी मागण्यांबाबतचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रतन चावला, रवींद्र भदाणे तर रिपाइं आठवले गटाचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष बोराडे यांनी दिले. पंचवटी प्रवासी रेल्वे संघटनेच्या माध्यमातून केशव केवलानी यांनी विविध सुविधा उपलब्ध करण्याबाबत मंत्रिमहोदयांशी चर्चा केली.

सावरकरांना भारतरत्न देणार
केवळ भारतात नव्हे तर संपूर्ण जगात ज्यांचा नावलौकिक आहे त्यांच्याविषयी प्रचंड आदर आहे अशा भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना केंद्र शासनाकडून लवकरच भारतरत्न देण्याचे प्रयोजन असल्याचे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी दै.’पुढारी’च्या प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले.

Back to top button