पर्यावरण, मूल्यशिक्षण, स्त्री-पुरुष समानतेवर भर..! | पुढारी

पर्यावरण, मूल्यशिक्षण, स्त्री-पुरुष समानतेवर भर..!

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद अर्थात विद्या प्राधिकरणाने तीन ते आठ वर्षांच्या विद्यार्थ्यांसाठी नेमका अभ्यासक्रम कसा असावा, याचा एक आराखडा जाहीर केला आहे. यामध्ये पर्यावरण, मूल्यशिक्षण, स्त्री-पुरुष समानतेवर भर देण्यात आला आहे. तसेच शांततेसाठी शिक्षण, मानवी हक्कांची जपणूक, श्रमसंस्कार विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

उद्बोधन व्हावे

भारतीय राज्यघटनेमध्ये जीवन, स्वातंत्र्य, समता, प्रतिष्ठा याविषयी हक्कांचा समावेश आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावरील काही हक्क मानवी हक्क कायद्यात समाविष्ट आहेत. या हक्कांचा परिचय अभ्यासक्रमात व्हावा तसेच त्यांच्या अंमलबजावणीविषयी निरनिराळ्या विषयांच्या माध्यमातून उद्बोधन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

मनावर बिंबवणे अपेक्षित

शारीरिक व बौद्धिक श्रमातून माणसाने अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा पूर्ण करण्याचे प्रगत व कल्पक मार्ग शोधले आहेत. त्यापलीकडे जाऊन विविध रसायने, भव्य सुंदर वास्तू, संगणक, अवकाशयान आदी थक्क करणारी यंत्रसामग्री अशी स्वतंत्र मानवनिर्मित सृष्टी तयार केली आहे. त्यामुळे शालेय अभ्यासक्रमातून श्रमसंस्काराचा समावेश मूलभूत व अपरिहार्य आहे. हे संस्कार करताना काही महत्त्वाची तत्वे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवणे अपेक्षित आहे, असेदेखील स्पष्ट करण्यात आले आहे.

शांततेसाठी शिक्षण

एकविसावे शतक तंत्रज्ञानातील विस्मयजनक आविष्कार आणि निरनिराळ्या क्षेत्रातील
समृद्धीबरोबर अशांती आणि ताणतणावही बरोबर घेऊन आले आहे. ते कमी करण्यासाठी मनात ताण कशामुळे निर्माण होतो याविषयी आत्मनिरीक्षण करण्यास प्रोत्साहन द्यायला हवे. तसेच विश्वशांतीविषयी उद्बोधन करताना कुटुंब आणि मित्रपरिवारात शांतिपूर्ण संबंध राखणे कसे महत्त्वाचे आहे आणि त्यातूनच जागतिक पातळीवरील शांततेचा मार्ग सापडण्याची शक्यता आहे, हे ठसविले पाहिजे.

समानता रुजवावी

स्त्री-पुरुष समानता हे मूल्य निरनिराळ्या विषयांतून रुजवण्याबरोबर त्याविषयी स्थानिक परिस्थितीनुसार नियोजन उपयोगी ठरणार आहे. अशी असमानता शाळेत व घरी कोठे कोठे आढळते हे शोधण्यासाठी व एकत्र चर्चेतून ती दूर करण्यासाठी व्यावहारिक कार्यक्रम निश्चित केल्यास अधिक चांगला परिणाम दिसू शकेल. स्त्रियांमध्ये पुरुषांप्रमाणे सर्व क्षमता आहेत हे ठसविताना केवळ लोकोत्तर महिलांची उदाहरणे न निवडता अलीकडच्या काळातील, आसपासच्या परिसरातील उदाहरणे निवडल्यास मुलांना ती अधिक भावतील.

जबाबदारी स्वीकारावी लागणार

राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर पर्यावरण शिक्षणाचे महत्त्व वाढत आहे. लोकसंख्या वाढीच्या गरजा भागविण्यासाठी तंत्रज्ञानाचा आणि निरनिराळ्या ऊर्जासाधनांचा शोध आणि वाढता वापर अपरिहार्य आहे. परंतु, त्यातून होणार्‍या पर्यावरण हानीमुळे नजीकच्या भविष्यकाळात मानवजात अस्तित्वात राहील की नाही, असा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे याविषयी जागरूकता, प्रत्येकाने आपल्या स्तरावर करायची उपाययोजना याचे भान अधिकाधिक प्रमाणात निर्माण होण्याची जबाबदारी प्रत्येक अभ्यासक्रमास स्वीकारावी लागणार आहे.

गुंफण आणि रुजवण अपेक्षित

परिसरात जे घडते त्याचे अनुकरण मुलांकडून होत असते. त्यामुळे चांगली मूल्ये रुजायची असतील तर शाळेत व घरात ती मूल्ये पाळली जात आहेत, हे निरनिराळ्या प्रसंगांतून विद्यार्थ्याला जाणवायला हवे. बोधप्रद कथा, गीते यापुरते मूल्यशिक्षण मर्यादित राहता कामा नये. याविषयी शिक्षक-पालक यांनी सामाईक कार्यक्रम आखणे उपयुक्त होईल. मूल्यशिक्षण हा स्वतंत्रपणे शिकवायचा भाग नाही. निरनिराळे विषय शिकविताना योग्य ठिकाणी त्यांची गुंफण आणि रुजवण पूर्वीप्रमाणेच अपेक्षित आहे.

हेही वाचा

Back to top button