वरवरची माहिती पाठवून मालमत्ता विभागाची बोळवण : क्षेत्रीय कार्यालय उदासीन | पुढारी

वरवरची माहिती पाठवून मालमत्ता विभागाची बोळवण : क्षेत्रीय कार्यालय उदासीन

हिरा सरवदे

पुणे : ताब्यातील मिळकतींच्या सद्यस्थितीची सविस्तर माहिती देण्याची मालमत्ता व्यवस्थापन विभागाने वारंवार सूचना करूनही आणि नोटीस बजावूनही क्षेत्रीय कार्यालयांकडून केवळ वरवरची माहिती पाठवण्यात आली. संबंधित मिळकती कोणाच्या ताब्यात आहे, संबंधितांवर थकबाकी आहे का, याबाबतची कोणतीही माहिती न पाठवता, केवळ अपूर्ण आकडेवारी पाठवली आहे. क्षेत्रीय कार्यालयांचा मनमानी कारभार थांबत नसल्याने मालमत्ता विभागाने मिळकतींची माहिती घेण्याची प्रक्रियाच थांबविली आहे.

महापालिकेच्या कारभारामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि जबाबदारीचे विकेंद्रीकरण करण्यासाठी 15 क्षेत्रीय कार्यालयांची निर्मिती करण्यात आली. क्षेत्रीय कार्यालयांकडून समाज मंदिर, अंगडवाडी, आरोग्य कोट्या, व्यायाम शाळा, दवाखाने, विरंगुळा केंद्र, स्मशानभूमी, दफनभूमी, शाळा, उद्याने, सामाजिक सभागृहे यांसह 12 मीटर रुंदीच्या आतील रस्ते अशी विविध कामे करून घेतली जातात. याशिवाय क्षेत्रीय कार्यालयांना त्या-त्या परिसरातील अनधिकृत फ्लेक्स, होर्डिंग, बॅनर, अतिक्रमण काढणे, रस्ते पदपथ दुरुस्त करणे अशीही कामे करावी लागतात.

दरम्यान, क्षेत्रीय कार्यालयांच्या ताब्यात असलेले बहुसंख्या हॉल, समाजमंदिर, वाचनालये, विरंगुळा केंद्र माननीयांच्या संस्था चालवण्यास घेतात. ज्या उद्देशासाठी सदर मिळकत बांधलेली असते, तो उद्देश सोडून इतर कामे चालवली जातात. राजकीय कार्यालये थाटली जातात. महापालिकेचे भाडे थकविले जाते. इतकेच नाही, तर महापालिकेला अंधारात ठेवून या मिळकती भाड्याने देऊन भाडे लाटले जाते. परस्पर भाडे लाटण्याचे अनेक प्रकार उजेडात आले आहे. या पार्श्वभूमीवर मालमत्ता व्यवस्थापन विभागाने 27 जुलै 2023 रोजी परिपत्रक काढून क्षेत्रीय कार्यालयांना आपल्या ताब्यातील मिळकतींची सविस्तर माहिती देण्याच्या सूचना केल्या.

पुढील तीन ते साडेतीन महिने कोणीही माहिती दिली नाही. उपायुक्तांसह सहायक आयुक्तांना नोटीस बजावल्यानंतर केवळ वरवरची माहिती देण्यात आली. त्यानंतर काही दिवस मालमत्ता विभागाने पाठपुरावा केला. मात्र, क्षेत्रीय कार्यालयांनी त्याला दाद दिली नाही. त्यामुळे मालमत्ता व्यवस्थापन विभागाने माहिती संकलित करण्याची प्रक्रियाच थांबवली आहे.

क्षेत्रीय कार्यालयांनी पाठवलेली माहिती

औंध बाणेर – 111, कोंढवा येवलेवाडी – 12, शिवाजीनगर घोले रोड – 30, नगर रोड – 18, वानवडी रामटेकडी – 48, हडपसर मुंढवा – 173, ढोले पाटील – 71, कोथरूड बावधन – 62, वारजे कर्वेनगर – 55, विश्रामबागवाडा – 40, भवानी पेठ – 113, येरवडा कळस – 00 (निरंक), धनकवडी – 41, सिंहगड रस्ता – 44, बिबवेवाडी – 20

सभागृह परस्पर भाडेतत्त्वावर

कोंढवा येथील एक माजी नगरसेवक आपल्या निधीतून विकसित केलेले सभागृह लग्नकार्यांसाठी देत असल्याची तक्रार दुसर्‍या पक्षातील माजी नगरसेवकाने केली होती. तक्रारीची खातरजमा केल्यानंतर हे काम परस्परपणे चार महिन्यांपासून सुरू असल्याचे समोर आले. त्यानंतर हे सभागृह सील करण्यात आले. मात्र, या माजी नगरसेवकाने सभागृहाचे सील परस्पर काढून पुन्हा वापर सुरू केला. त्यामुळे आयुक्तांनी याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

हेही वाचा

Back to top button