शिरूर तालुका ‘उडता पंजाब’च्या मार्गावर; पोलिस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज | पुढारी

शिरूर तालुका ‘उडता पंजाब’च्या मार्गावर; पोलिस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज

शिक्रापूर : पुढारी वृत्तसेवा : शिरूर तालुक्यातील गावांमध्ये ड्रग्जनिर्मिती कारखाना, नशिल्या अफूची लागवड तसेच पान टपर्‍यांमधून गुंगी आणणार्‍या पानांची विक्री होत असल्याच्या घटना उघड झाल्या आहेत. यामुळे शिरूर तालुका आता उडता पंजाब बनण्याच्या मार्गावर आहे. शिरूर तालुक्यातील पश्चिम भागातील डोंगराळ भागात असलेल्या मिडगुलवाडी गावामध्ये मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये अंमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) कारवाई करत ड्रग्जनिर्मिती करणार्‍या कंपनीचा पर्दाफाश केला होता.

घटनास्थळावरून सुमारे 174 किलो अल्प्रा झोलम नामक ड्रग्ज व इतर साहित्य जप्त केले होते. बारीक-सारीक गोष्टींची खडनखडा माहिती ठेवणार्‍या पोलिसांना मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्जनिर्मिती होत असताना कानोकान खबर लागली नव्हती. याबाबत आश्चर्यही व्यक्त केले जात होते. यापाठोपाठ दोनच दिवसापूर्वी शिक्रापूरमध्ये शेती व प्लॉटिंगमध्ये अफूच्या झाडांची लागवड झालेली तब्बल 1 हजार 226 झाडे आढळून आली. याचबरोबर शिरूर तालुक्यात अनेक ठिकाणी गावठी दारू तसेच गांजा वाहतूक करणार्‍या वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे.

मागील काही महिन्यांपूर्वी शिक्रापूर पोलिसांनी पुणे-नगर रस्त्यावरील पान टपर्‍यांवर कारवाई करत काही मसाला हस्तगत केला होता. अन्न प्रशासन विभागाकडे तो पाठवून त्यात काही अंमली पदार्थांचा समावेश आहे का याचा शोध घेतला जाणार होता. याप्रकरणी काही पानटपरी मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. शिरूर तालुक्यातील तरुणाई व्यसनाच्या आहारी जात आहे. पोलिस व प्रशासनाने या गंभीर समस्येवर खंबीरपणे पावले उचलून धडक कारवाई केली पाहिजे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
हेही वाचा

Back to top button