अत्याधुनिक कॅप्सूल करवणार अंतराळाची सफर | पुढारी

अत्याधुनिक कॅप्सूल करवणार अंतराळाची सफर

वॉशिंग्टन : अंतराळ यात्रेसाठी तयार केल्या गेलेल्या सर्वात मोठ्या कॅप्सूलच्या प्राथमिक चाचणीची तयारीआता अंतिम टप्प्यात आली आहे. या कॅप्सूलमधून एका वेळी 8 जण प्रवास करू शकतील. याचे प्रत्येकी तिकीट 12,500 डॉलर्स अर्थात भारतीय चलनात 10.36 लाख रुपये इतके निश्चित केले गेले आहे.

फ्लोरिडा स्थित स्पेस पर्सपेक्टिव्हने स्पेसशिप नेपच्यून-एक्सेलसियरच्या फायनल व्हर्जनचे प्रदर्शन साकारले. गोलाकार फुटबॉल मैदानाच्या आकारातील हे कॅप्सूल 20 मैल वर जाईल आणि त्यानंतर एकूण 6 तासांची सफर घडवेल. प्रत्यक्ष अंतराळ सफरीला पुढील वर्षापासूनच सुरुवात होणार असली, तरी आताच कंपनीकडे 1700 जणांनी बुकिंग केले आहे.

हायड्रोजन इंधनाच्या माध्यमाने या कॅप्सूलचा सर्व प्रवास पूर्ण केला जाणार आहे. या कॅप्सूलमध्ये बसलेले प्रवासी आपल्या विंडोमधून कोणत्याही दिशेने थोडेथोडके नव्हे, तर चक्क 450 मैलापर्यंतचा नजारा डोळ्यात साठवू शकतील. या कॅप्सूलमध्ये वायफायची सुविधा असेल. स्पेस लाऊंजमध्ये 6 तास व्यतीत केल्यानंतर हे कॅप्सूल सुरक्षितरीत्या पृथ्वीवर उतरणार आहे.

फ्लोरिडातील या कॅप्सूलचा आकार स्पेसशिप-2 व न्यू शेफर्डच्या तुलनेत दुपटीने मोठा आहे. याशिवाय, स्पेसएक्सच्या क्रू ड्रॅगनपेक्षा चौपटीने भव्यदिव्य आहे. या वर्षाच्या उत्तरार्धात या कॅप्सूलचे पहिले परीक्षण होईल आणि त्यातील यशस्वितेनंतर प्रत्यक्ष अंतराळ सफरीची योजना साकारली जाईल, असे सध्याचे संकेत आहेत.

Back to top button