पुण्यात पाणीकपात नाही; उन्हाळ्यात सिंचनाचे एकच आवर्तन होणार | पुढारी

पुण्यात पाणीकपात नाही; उन्हाळ्यात सिंचनाचे एकच आवर्तन होणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे शहरात पाणीकपात होणार नसून, 15 जुलैपर्यंतच्या पिण्यासाठीचे पाणी खडकवासला प्रकल्पात आरक्षित ठेवण्यात येणार आहे. उन्हाळ्यामध्ये शेतीसाठी सिंचनाचे एकच आवर्तन देण्यात येणार आहे. ते मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्याचे नियोजन आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत याबाबत शनिवारी निर्णय होईल. खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये सध्या गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन अब्ज घनफूट (टीएमसी) कमी पाणीसाठा आहे. प्रकल्पात आज 16.14 टीएमसी (55.35 टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी 23 फेब्रुवारीला तो 19.13 टीएमसी (65.60 टक्के) होता. त्यामुळे पाण्याचा वापर सर्वांनीच जपून करण्याचे आवाहन जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांनी केले आहे.

उन्हाळी सिंचनासाठी दोन आवर्तने दिली जातात. यंदा धरणात कमी पाणीसाठा असल्यामुळे एकच आवर्तन देता येणार आहे. एप्रिलच्या मध्यापर्यंत सुमारे साडेचार टीएमसी पाणी देण्यात येणार असल्याचे समजते. त्यानंतर मे महिन्याच्या अखेरीला ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांना पाणी पुरविले जाईल. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पालखी सोहळा असल्यामुळे त्यासाठीही पाणी कालव्याद्वारे सोडावे लागणार आहे. पुणे शहराला 15 जुलैपर्यंत सुमारे सव्वाआठ टीएमसी पाणी लागेल तसेच जुलैअखेरपर्यंत नऊ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे.

सुमारे एक टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होईल. त्यामुळे धरणातील पाणीसाठा काटकसरीने आणि काटेकोरपणे वापरल्यास तो पुरेसा ठरण्याची शक्यता आहे. सध्याच्या दैनंदिन वापरानुसार रोज सुमारे 1450 दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी पुणे शहराला पुरविले जाते. त्यानुसार 15 जुलैपर्यंतचे पाणी राखून ठेवण्यात येणार आहे. लोकसभेचे मतदान होईपर्यंत पाणीकपात होणार नाही. मात्र, पाण्याचा साठा कमी-जास्त झाल्यास मे किंवा जूनमध्ये पाणीकपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत खडकवासला, चास-कमान, भामा-आसखेड, पवना, निरा डावा आणि उजवा कालवा, कुकडी, घोड प्रकल्प येथील पाणी वाटपाचे नियोजनही करण्यात येणार आहे.

या अन्य प्रकल्पांमध्ये पिण्याच्या पाण्याची फारशी मागणी नसते. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा पुरेसा पुरवठा करण्यात येईल. चास-कमान, भामा-आसखेड, पवना येथे पुरेसा पाणीसाठा असल्याने तेथे नेहमीप्रमाणे नियोजन होईल. निरा खोर्‍यातील चार धरणांत एकूण 24 टीएमसी (49.73 टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. निरा उजवा कालवा पुण्यासह सातारा, सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यांत सिंचनासाठी पाणीपुरवठा करतो. ठिकठिकाणी साखर कारखान्यांसाठी ऊस लागवड या पाण्यावर अवलंबून असते. उजवा कालव्याच्या एका आवर्तनासाठी सुमारे सात टीएमसी पाणी लागते. धरणांत कमी पाणीसाठा असल्याने उजव्या कालव्यातून एकच आवर्तन मिळण्याची शक्यता आहे. निरा डावा कालव्यातून बारामती व इंदापूर तालुक्यांतील शेतीला पाणी पुरविले जाते. तेथील एका आवर्तनासाठी साडेतीन टीएमसी पाणी लागते. या भागातील उन्हाळी पिकांच्या सिंचनासाठी दोन आवर्तने मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा

Back to top button