राजगडावरील तलावांचे पाणी दूषित; पहारेकर्‍यांसह पर्यटकांचे हाल

राजगडावरील तलावांचे पाणी दूषित; पहारेकर्‍यांसह पर्यटकांचे हाल

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : छत्रपती श्रीशिवाजी महाराज यांच्या उत्कृष्ट जलव्यवस्थापनाचा वारसा राजगड किल्ल्यावर शेकडो वर्षांपासून जिवंत आहेत. ऐन उन्हाळ्यात पायथ्याला पाणीटंचाई असतानाही गडावरील तलावांत मुबलक पाणी असते. मात्र, या तलावांतील पाणी हे दूषित झाले असून, पहारेकर्‍यांसह पर्यटकांचे हाल सुरू आहेत. विकतच्या पाण्यावर पर्यटकांना तहान भागवावी लागत आहे. खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी पॅकबंद पाण्याचे दर वाढवले आहेत. एक लिटर पाण्याची बाटली 50 रुपयांना विकली जात आहे.

राजगडावर मुबलक प्रमाणात पाणी आहे. मात्र, तलावांची स्वच्छता, शुध्द पाणीपुरवठा आदीकडे पुरातत्व खात्याने दुर्लक्ष केले आहे. सर्वात गंभीर स्थिती गडावर मुक्कामी राहणार्‍या पुरातत्व खात्याच्या पहारेकर्‍यांची आहे. सायंकाळी 5 नंतर गडाचे दरवाजे बंद करून पहारेकरी मुक्काम करतात. मात्र, त्यांनाच स्वयंपाकासाठीही पाणी मिळत नसल्याची गंभीर स्थिती आहे. बालेकिल्ल्यावरील चंद्रकोर तलाव तसेच पद्मावती माचीवरील तलावात मुबलक प्रमाणात पाणी आहे. मात्र, या तलावांतील पाणीदेखील हिरवेगार व शेवाळयुक्त होऊन दूषित झाले आहे. पद्मावती मंदिराजवळील दोन्ही टाकी कोरडी पडली आहेत.

त्यामुळे अनेक पर्यटक तसेच पहारेकरी यांना पद्मावती तलावांतील दूषित पाण्याचा वापर करावा लागत आहे. तर छत्रपती श्रीशिवरायांच्या राजसदरेच्या पाठीमागच्या बाजूला असलेल्या राणीवसा तलावातील झर्‍याचे थोडेफार पाणी मिळत आहे. रात्रभर केवळ चार ते पाच लिटर पाणी जमा होते. त्यावर तीन पहारेकरी तहान भागवत आहेत. यंदा शिवजयंतीच्या आधीच दोन्ही टाके कोरडी पडली. त्यामुळे शिवज्योतीसाठी गडावर आलेल्या शेकडो शिवभक्तांचे हाल झाले.

गडाखाली 20 रुपयांना मिळणारी एक लिटर पाण्याची बाटली गडावर तब्बल 50 रुपयांना विकली जात आहे. खाद्यपदार्थ विक्रेते गडावरील पाणीटंचाईमुळे पर्यटकांची लूट करत आहेत. गडावर पाणी असताना 30 रुपयाला बाटली विकली जात होती. आता तिचा दर 40 ते 50 रुपये झाला आहे. पद्मावती मंदिराच्या शेजारी असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या दोन्ही टाक्यांतील पाणी संपले आहे. त्यामुळे पद्मावती तलावातील हिरवे पाणी प्यावे लागत आहे. दूषित पाण्यामुळे गडावर मुक्काम करणे गैरसोयीचे झाले आहे. वारंवार आजारी पडत असल्याचे पुरातत्व विभागाचे पहारेकरी बापु साबळे व पवन साखरे यांनी सांगितले.

राजगडावरील तलावांत मुबलक पाणी आहे. अलीकडच्या काळात पर्यटकांची संख्या वाढली आहे, त्यामुळे गडावरील पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांतील पाणी उन्हाळ्यात संपते. त्यामुळे इतर तलावांतील पाण्याचे शुद्धीकरण करून ते पिण्यासाठी उपलब्ध केले जाणार आहे. त्यासाठी स्वतंत्र आराखडा तयार करण्यात येत आहे.

– डॉ. विलास वाहणे, सहसंचालक, पुरातत्व खाते.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news