अदृश्य शक्तीच्या विरोधातील लढा सुरुच ठेवू : खा. सुप्रिया सुळे 

अदृश्य शक्तीच्या विरोधातील लढा सुरुच ठेवू : खा. सुप्रिया सुळे 
बारामती : पुढारी वृत्तसेवा : ज्याने पक्ष स्थापन केला त्या संस्थापक अध्यक्षाकडून तो हिसकावून दुसऱ्याला देण्याची घटना या देशात पहिल्यांदाच घडली. अर्थात या मागे देश चालविणारी अदृश्य शक्ती आहे. या शक्तीने आम्हाला कितीही धमकावले, अन्याय केला, घात केली तरी त्यांच्या विरोधातील आमची लढाई सुरुच राहिल, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. बारामतीत त्या पत्रकारांशी बोलत होत्या. खा. सुळे म्हणाल्या, राष्ट्रवादीची स्थापना शरद पवार यांनी केली. परंतु अतिशय चुकीच्या पद्धतीने संस्थापक अध्यक्षावर अन्याय झाला. अशी दुदैवी घटना देशाच्या इतिहासात कधी घडली नाही. अदृश्य शक्तीची ही खेळी आहे.
ही अदृश्य शक्तीच आता देश चालवते आहे. हा देश डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार चालला पाहिजे. परंतु आता तो अदृश्य शक्ती स्वतःच्या मर्जीने चालवताना दिसत आहे. अशी परिस्थिती असली तरी आमचा संघर्ष सुरुच राहिल. सर्वोच्च न्यायालयातील लढ्यात सध्या ज्यांच्याकडे राष्ट्रवादी पक्ष व चिन्ह आहे त्यांच्या वकीलांनी युक्तिवाद केला की, यांना पक्ष व चिन्ह देता कामा नये. परंतु सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले की, या देशात लोकशाही आहे. चुकीच्या पद्धतीने चिन्ह काढून घेतल्याने शेजारच्या देशात काय परिस्थिती निर्माण झाली, तुम्ही बघत आहात. लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निकालाबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो.
या देशात वकील किंवा अन्य कोणाची मनमानी चालणार नाही. सर्वोच्च न्यायालयाची ऑर्डर आम्ही तात्काळ निवडणूक आयोगाला दिली. मेरिटनुसार आम्हाला मूळ पक्ष व घड्याळ चिन्ह मिळणे अपेक्षित होते. परंतु अदृश्य शक्तीच्या मनमानीमुळे ते मिळाले नाही. तरीही आम्ही घाबरणार नाही. शून्यातून सुरुवात करून उभे राहू.  राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार व नवीन तुतारी चिन्ह यापुढे काय करेल तुम्ही बघाल.

मनोहर जोशींना वाहिली श्रद्धांजली

शिवसेनेचे दिवंगत नेते, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना खा. सुळे यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ठाकरे, पवार, जोशी, महाजन, मुंडे या परिवाराचे राजकीय विचार वेगळे होते. परंतु कौटुंबिक जिव्हाळा कायम आहे, असे त्या म्हणाल्या.
हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news