दुधाच्या पाच रुपये अनुदान वाटपाला सुरुवात

दुधाच्या पाच रुपये अनुदान वाटपाला सुरुवात

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्याच्या दुग्ध व्यवसाय विकास विभागाने ऑनलाईन सॉफ्टवेअरमध्ये पहिल्या दहा दिवसांची (दि. 11 ते 20 जानेवारी 2024) माहिती दोनदा भरण्यास दुग्ध व्यवसाय विकास सचिव तुकाराम मुंडे यांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार संपूर्ण माहितीसह परिपूर्ण प्रस्ताव प्राप्त दूध संघांच्या शेतकर्‍यांच्या थेट बँक खात्यावर पहिल्या टप्प्यातील प्रतिलिटर पाच रुपये अनुदान वितरणास सुरुवात झाल्याची माहिती दुग्ध व्यवसाय विकास आयुक्त प्रशांत मोहोड यांनी दिली.

राज्याचे महसूल व दुग्ध विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि दुग्ध व्यवसाय विकास सचिव तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली योजनेची यशस्वी अंमलबजावणी सुरू आहे. राज्यातील सहकारी दूध संघ, खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणार्‍या शेतकर्‍यांना 11 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या कालावधीसाठी पाच रुपये अनुदान योजना आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून 280 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, पहिल्या टप्प्यातील अनुदान निधी दुग्ध आयुक्तालयाकडे उपलब्ध झाल्याचे मोहोड यांनी सांगितले.

अद्ययावत माहिती जतन केली जाणार

दुग्ध व्यवसाय सचिव तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारच्या नॅशनल डिजिटल लाईव्ह स्टॉक मिशन या अ‍ॅपशी राज्याच्या दुग्ध व्यवसायाचे सॉफ्टवेअरशी संलग्न करून, सर्व दूध उत्पादक शेतकर्‍यांची अद्ययावत माहिती अपलोड करून जतन केली जाणार आहे. त्यातून भविष्यात केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना राबविताना दूध उत्पादक शेतकर्‍यांना त्याचा लाभ होऊन त्यांचे आर्थिक स्रोत व जीवनमान उंचाविण्यास मदत होईल.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news