राधानगरी येथे अपघात : एका भावाचा मृत्यू, दुसरा अत्यवस्थ | पुढारी

राधानगरी येथे अपघात : एका भावाचा मृत्यू, दुसरा अत्यवस्थ

राधानगरी, पुढारी वृत्तसेवा : राधानगरी येथे अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर मागे बसलेला त्यांचा सख्खा भाऊ गंभीर जखमी झाला. बंडोपंत आनंदा पाटील (वय 50, रा. घोटवडे, ता. राधानगरी) असे मृताचे नाव असून विश्वास आनंदा पाटील (48) असे जखमीचे नाव आहे.

याबाबतची माहिती अशी, बंडोपंत आणि विश्वास दोघे भाऊ कामासाठी मोटारसायकलवरून राधानगरी तहसील कार्यालयात आले होते. दुपारी दोनच्या सुमारास काम आटोपून घोटवडेकडे परत जात असताना तहसील कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर कोकणातून येणार्‍या अज्ञात वाहनाने पाठीमागून त्यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. यामध्ये बंडोपंत यांचा जागीच मृत्यू झाला तर मागे बसलेले विश्वास गंभीर जखमी झाले. जखमीला तत्काळ येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून कोल्हापूर येथे दाखल करण्यात आले. घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक व्ही. एन. घाटगे व उपनिरीक्षक गायकवाड यांनी भेट देऊन पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे.

येथील ग्रामीण रुग्णालयात विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सायंकाळी घोटवडे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत बंडोपंत सरळमार्गी स्वभावाचे होते. अचानक घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Back to top button