बारामतीच्या कसबा भागातील राष्ट्रवादी भवनातून शरद पवार गटाने हलविले साहित्य | पुढारी

बारामतीच्या कसबा भागातील राष्ट्रवादी भवनातून शरद पवार गटाने हलविले साहित्य

बारामती; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर शहरातील कसबा भागात राष्ट्रवादी भवनची भव्य वास्तू उभी राहिली. या वास्तूमध्ये सभेसाठी भव्य सभागृहासह पदाधिकाऱ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली होती. पक्ष फुटीनंतर गुरुवारी (दि. २२) शरद पवार गटाकडून येथील साहित्य हलविण्यात आले. गेल्या २० वर्षांपासूनचे राष्ट्रवादी भवनाशी असलेले ऋणानुबंध यानिमित्ताने संपुष्टात आले. या कार्यालयात आमच्या दैवताचा फोटोही ठेवला गेला नाही, तिथे साहित्य ठेवून तरी उपयोग काय असे सांगत येथील साहित्य नेण्यात आले.

दि. २ जुलै रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप-शिवसेनेसोबत सरकारमध्ये सहभागी व्हायचा निर्णय घेतला. त्यानंतर काय घडामोडी घडतात, याकडे बारामतीकर लक्ष ठेवून होते. पक्ष फुटीला आता सहा महिन्यांहून अधिक काळ लोटला. परंतु अजूनही बारामतीतील कसबा येथे असलेल्या राष्ट्रवादी भवनातून अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे या दोघांचेही काम चालायचे. खा. सुळे यांच्या स्वीय सहाय्यकांची येथे स्वतंत्र केबीन होती.

पक्षातील संघर्ष टोकाला गेल्यानंतर या कार्यालयातून ज्येष्ठ नेते शरद पवार, खा. सुप्रिया सुळे यांचे फोटो काढून टाकण्यात आले. त्यानंतर आता शरद पवार गटानेही येथील आपले साहित्य हलवले. आम्हाला कोणाचाही त्रास नाही. आमच्याशी कोणी बोललेलं नाही. परंतु आमचं दैवत या कार्यालयातून हलवलं, आता तिथे राहून काय उपयोग असा उद्विग्न सवाल करत कार्यकर्त्यांनी हे कार्यालय सोडले.

अजित पवार यांच्या गटाचा तालुक्याचा कारभार कसब्यातील राष्ट्रवादी भवनातून तर शहराचा कारभार शारदा प्रांगणातील राष्ट्रवादी भवनातून चालवला जात आहे. शरद पवार गटाने भिगवण चौकात नुकतेच नवीन कार्यालय सुरु केले. खा. सुळे यांच्या हस्ते त्याचे उद्घाटनही झाले आहे. सुळे यांच्यासाठी राष्ट्रवादी भवनात असलेली केबिन खाली करण्यात आली असल्याचे शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. दुसरीकडे जेव्हापासून राष्ट्रवादी फूट पडली आहे, तेव्हापासून कुणीही या कार्यालयात आलेले नसल्याचे अजित पवार गटाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा

Back to top button