जे पक्षाशी एकनिष्ठ नाहीत, ते लोकांशी काय राहणार : शरद पवार | पुढारी

जे पक्षाशी एकनिष्ठ नाहीत, ते लोकांशी काय राहणार : शरद पवार

मंचर : पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्यातील तिकडे गेलेल्या माझ्या सहकार्‍याला विधानसभा अध्यक्षपद, अर्थ, ऊर्जा, गृह या खात्यांच्या मंत्रिपदासह विविध संस्थांमध्ये काम करण्याची संधी दिली. मात्र, त्यांनी पाच टक्केदेखील निष्ठा दाखवली नाही. ज्यांनी पक्षाशी निष्ठा ठेवली नाही ते नागरिकांशी निष्ठा ठेवतील का याचा विचार करणे गरजेचे आहे, अशी टीका ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार यांनी एकेकाळचे त्यांचे मानसपुत्र अशी ओळख असलेल्या सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे नाव न घेता केली.

बुधवारी (दि. 21) मंचर (ता. आंबेगाव) या वळसे पाटील यांच्या ’होमपिच’वर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आयोजित सभेत पवार बोलत होते. या वेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, आ. रोहित पवार, आ. अशोक पवार, ‘विघ्नहर’ चे अध्यक्ष सत्यशील शेरकर, मेळाव्याचे निमंत्रक आणि पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष देवदत्त निकम, बाळासाहेब बाणखेले, राजाराम बाणखेले, काँग्रेस पक्षाचे राजूभाई इनामदार, उद्योजक गुलाबराव धुमाळ, किसनशेठ उंडे, धोंडीभाऊ भोर, स्वप्नील गायकवाड, दादाभाऊ थोरात, विशाल वाबळे, गणेश यादव, दौलतराव भोर, विजय रसाळ, गोपाळराव गवारी, स्वातीताई मुळे यांसह महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते उपस्थित होते.

या वेळी शरद पवार म्हणाले की, सध्या देशात सत्ताधार्‍यांच्या विरोधात बोलल्यावर खोटी केस, खोटी चौकशी लावून तुरुंगात टाकले जाते. त्यामुळे आता तुरुंगात जा, नाहीतर भाजपात या, अशी परिस्थिती निर्माण झाली असून, तुरुंगापेक्षा भाजपा बरा असे बोलले जात आहे, असा आरोपही पवार यांनी केला. ते म्हणाले, जाहिरातीद्वारे शेतकर्‍यांचे प्रश्न सोडवले, तरुणांना रोजगार दिला हे दाखवले जात आहे. मात्र, शेतकरी अडचणीत आहे. आजचे राज्यकर्ते त्यांच्या मनासारखे वागत आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, आपल्याबरोबर कोण आहे, कोण नाही याचा विचार न करता कामाला लागायचे आहे. शून्याचे शंभर कसे करायचे याची ताकद शरद पवार यांच्याकडे आहे.

शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीला दाखवून द्यायची गरज आहे. शरद पवार म्हणजे दिल्लीत महाराष्ट्राची ओळख आहे. पुढील निवडणुकीत दिल्लीतून गुबूगुबू वाजले की माना हलवणारे लोकसभेत पाठवायचे की आपल्या हक्कासाठी लढणारे वाघ पाठवायचे हे जनतेने ठरवायचे आहे. पोटी जन्माला येण्यापेक्षा ज्यांनी बोट धरून चालायला शिकवले त्यांची साथ द्यायची सोडून दुसर्‍या पक्षाला जाऊन मिळाले आहेत.

पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष देवदत्त निकम म्हणाले, आंबेगाव तालुक्यासाठी शरद पवार यांनी खूप काही दिले असून, भीमाशंकर साखर कारखाना, डिंभे धरण, उजवा कालवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाला आहे. यामुळे तालुक्यातील शेतकरी प्रगतशील झाला आहे. शरद पवार हेच आंबेगाव तालुक्याचे भाग्यविधाते आहे. त्यामुळे पुढील काळात आपल्याला त्यांच्या मागे उभे राहायचे आहे. या वेळी आमदार रोहित पवार, आमदार अशोक पवार, सुनील भुसारी, बाळासाहेब बाणखेले, राहुल बहिरट, शंकरदादा जांभळकर, प्रवीण पारधी यांचे भाषण झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश यादव आणि नरेश डोमे यांनी केले.

हेही वाचा

Back to top button