वाहतूक कोंडीचा साधू वासवानी पुलाच्या कामात खोडा ! | पुढारी

वाहतूक कोंडीचा साधू वासवानी पुलाच्या कामात खोडा !

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कोरेगाव पार्क ते कॅम्प (नवीन विश्रामगृह) यांना जोडणारा साधू वासवानी रेल्वे उड्डाणपूल पाडून त्या ठिकाणी नवीन पूल बांधण्याचे काम वाहतूक कोंडीच्या प्रश्नामुळे रखडले आहे. पूल वाहतूक बंद ठेवल्याने या भागात प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने त्यावर नक्की कसा मार्ग काढायचा, असा प्रश्न प्रशासनापुढे उभा ठाकला आहे. त्यामुळे तुर्तास पूल पाडण्याचे काम बंद ठेवण्याची वेळ आली आहे. साधू वासवानी पूल पन्नास वर्षांपूर्वीचा असल्याने तो धोकादायक बनला आहे. त्यामुळे हा पूल पाडून महापालिका त्या ठिकाणी नव्याने पूल उभारणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून संबंधित ठेकेदाराला कामाचे आदेश देण्यात आले आहे. मात्र, जवळपास चार महिने उलटूनही ठेकेदाराला पुलाचे काम सुरू करता आलेले नाही.

नव्या पुलासाठी जुना अस्तित्वातील पूल पाडावा लागणार आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांनी सर्व तयारी करून जानेवारी महिन्यातील पहिल्या शनिवारपासून पुलावरील वाहतूक बंद करून पर्यायी मार्गाने प्रायोगिक तत्त्वावर वळविण्याचे ठरविले. त्यानुसार वाहतुकीसाठी पूल बंद करण्यात आला. मात्र, वाहतूक बंद करण्यात आल्यानंतर कोरेगाव पार्क, बंडगार्डन, नगर रस्ता, कौन्सिल हॉल, मोरवाडा या परिसरात पहिल्याच दिवशी वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली, त्यामुळे वाहतूक पोलिसांनी दुपारी लगेचच पूल वाहतुकीसाठी सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पूल पाडण्याचे काम पालिका प्रशासनाला सुरूच करता येऊ शकले नाही. आत्ता महिना उलटून नक्की वाहतूक कोंडी सोडवायची कशी, याचे उत्तर वाहतूक पोलिस आणि प्रशासनाला मिळालेले नाही. त्यामुळे पूल पाडून नवीन पूल उभारण्याचे काम सुरूच होऊ शकलेले नाही.

एकेरी वाहतूक करून चाचपणी

पूल बंद करून पर्यायी मार्गाने वाहतूक वळविल्यानंतर कोंडी होऊ नये यासाठी महापालिकेने दीडशे वाहतूक वॉर्डन नेमले आहेत. आता थेट पूल बंद न करता पहिल्या टप्प्यात एकेरी वाहतूक करून त्याचा वाहतुकीवर किती परिणाम होतोय याची चाचपणी केली जाणार आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, असे महापालिकेच्या वाहतूक विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

हेही वाचा

Back to top button