अभूतपूर्व गोंधळ! वादावादीने पुणे बार असोसिएशनच्या मतदानाला गालबोट | पुढारी

अभूतपूर्व गोंधळ! वादावादीने पुणे बार असोसिएशनच्या मतदानाला गालबोट

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मतपत्रिका मिळण्यास विलंब, वकिलांमधील वादावादी, मतदानावेळी वकिलांकडून सुरू असलेली हुल्लडबाजी अशा अभूतपूर्व गोंधळात वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनची निवडणूक बुधवारी (दि. 21) पार पडली. असोसिएशनच्या 7 हजार 923 सभासदांपैकी 3 हजार 947 वकिलांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदार यादीतील त्रुटींमुळे मतदान दोनदा पुढे ढकलल्याने गतवर्षीच्या तुलनेत यंदा मतदारांचा उत्साह कमी राहिल्याचे चित्र दिसून आले.

शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या अशोका हॉलमध्ये सकाळी नऊच्या सुमारास मतदानास सुरुवात झाली. दुपारनंतर मतदान करण्यास वकील वर्गाने मोठी गर्दी केली. सकाळच्या टप्प्यात मतदान सुरळीत पार पडले. मात्र, दुपारनंतर मतपत्रिका मिळण्यास विलंब होत असल्याने अशोका हॉल परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला. मतदार यादीत वगळण्यात आलेले नाव, महिलांसाठी स्वतंत्र रांगेचा अभाव, तसेच तासाभराच्या प्रतीक्षेनंतरही मतपत्रिका मिळत नसल्याने बहुतांश वकिलांनी नाराजी व्यक्त केली. मतपत्रिका मिळत नसल्याच्या कारणावरून वकिलांमध्ये वादावादी, तसेच उमेदवारांच्या प्रतिनिधींशी हुज्जत घालण्याचा प्रयत्नही झाला.

मतदानावेळी हुल्लडबाजीमुळे वकिलांना नियंत्रणात आणण्यासाठी वरिष्ठ वकिलांसह निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या नाकीनऊ आले.
मतदानाची वेळ संपल्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले. अशोका सभागृहाच्या पटांगणात वकिलांना मतपत्रिका मिळण्यासाठी उशीर झाल्याने सायंकाळी साडेसहापर्यंत मतदान सुरू होते. असोसिएशच्या अध्यक्षपदासाठी दोन उमेदवार, उपाध्यक्ष पदाच्या दोन जागांसाठी सात उमेदवार, सचिव पदाच्या दोन जागांसाठी सहा उमेदवार, ऑडिटरच्या एका जागेसाठी तीन उमेदवार रिंगणात आहेत. सर्वाधिक चुरस उपाध्यक्ष पदासाठी आहे. या जागेसाठी तब्बल सात उमेदवार रिंगणात आहेत. मतपत्रिकांची विभागणी करून रात्री मतमोजणी सुरू होऊन रात्रीच उशिरा निकाल लागणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी दादाभाऊ शेटे यांनी दिली.

हेही वाचा

Back to top button