प्रेमाचा त्रिकोण! दुसर्‍या घरोब्यासाठी पत्नीचा गळा आवळून दरीत फेकले

प्रेमाचा त्रिकोण! दुसर्‍या घरोब्यासाठी पत्नीचा गळा आवळून दरीत फेकले

अनेकवेळा नवरा-बायकोतील विसंवादाला प्रेमाचा त्रिकोण कारणीभूत असतो. त्याचे किंवा तिचे बाहेर कुठेतरी मधुर संबंध निर्माण झालेले असतात आणि हे मधुर संबंध त्या संसाराची राखरांगोळी करायला कारणीभूत ठरतात. अशाच प्रेम त्रिकोणामुळे एका हसत्या-खेळत्या संसाराची जी काही वाताहत झाली, त्याची ही कहाणी…

गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यातील दर्शेवाडा हे एक छोटेसे खेडेगाव. गाव तरी कसले एक वाडीच. याच गावात शरद आणि रत्नमाला यांचा संसार गोरगरिबीत का होईना पण सुखा-समाधानाने सुरू होता. शरद आणि रत्नमाला दोघेही मिळेल तो रोजगार करून संसाराचा गाडा हाकण्याचे प्रयत्न करीत होते. पण, शरदच्या मनात गेल्या काही दिवसांपासून भलतेच बेत शिजत होते. त्यानुसार एकेदिवशी त्याने रत्नमालाला तालुक्याच्या गावाला एका कामानिमित्त जायचे आहे, असे सांगून रत्नमालाला आपल्या सोबत घेतले आणि मोटारसायकलवरून दोघे निघाले. मात्र, मोटारसायकल भलत्याच रस्त्याला लागली, त्यावर रत्नमालाने शंका उपस्थित केली असता शरदने सांगितले की हा रस्ता जवळचा असून, आपण लवकर पोहोचू. त्यामुळे ती बिचारी गपगुमान मोटारसायकलवर बसून निघाली होती. रस्ता पूर्ण निर्जन, अवघड घाटाचा आणि चहुबाजूने घनदाट झाडीने वेढलेला होता. अचानक एका वळणावर मोटारसायकल स्लिप झाली आणि रत्नमाला खोल दरीत पडली, शरदही बाजूला पडला, त्याला बराच मार लागला; पण रत्नमाला बिचारी जागीच ठार झाली.

कुणीतरी गडचिरोली पोलिसांना ही खबर सांगताच पोलिस निरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्या ठिकाणी शरद धाय मोकलून रडत बसला होता. पोलिसांनी तातडीने दरीत उतरून रत्नमालाचा मृतदेह बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. पण, घटनास्थळावरील एकूणच परिस्थिती बाळासाहेब सूर्यवंशी यांना संशयास्पद वाटत होती. मोटारसायकल दरीच्या बरोबर कडेला पडलेली असताना, रत्नमाला दरीत पडलेली असताना, नेमका शरदच कसा काय दुसर्‍या बाजूला पडला, अशी शंका त्यांच्या मनाला चाटून गेली. त्यामुळे पहिल्यांदा त्यांना शरदचीच शंका आली; पण शरदने मात्र रडण्याचे सोंग हुबेहूब वटविले होते. रत्नमालाच्या मृत्यूमुळे आपण किती दु:खी झालोय हे दाखविण्याचा त्याचा आटापिटा सुरू होता.

त्यामुळे शरदला थेट न विचारता सूर्यवंशी यांनी त्याच्या मोबाईलचा धांडोळा घ्यायला सुरुवात केली. त्यावर शरद हा दररोज आपल्या मोबाईलवरून राजश्री नावाच्या एका महिलेशी बोलत असल्याचे दिसून आले. लागलीच सूर्यवंशी यांनी राजश्रीला पोलिस ठाण्यात पाचारण केले. कधी पोलिस ठाण्याची पायरीही न चढलेली राजश्री पोलिस ठाण्यात येताच तिची बोबडी वळायला लागली. पोलिसांनीही चाचपणी न करता थेट मुद्द्यालाच हात घातला, बोल राजश्री तुझे आणि शरदचे संबंध काय? सुरुवातीला राजश्रीने थोडे आढेवेढे घेतले; पण पोलिसांनी गुरकावताच तिने आपल्या कर्माचा पाढा वाचायला सुरुवात केली.

राजश्री ही शरदच्याच गावची एक विधवा महिला होती; पण गेल्या काही दिवसांपासून शरद आणि राजश्रीमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. त्यातूनच राजश्रीने शरदच्या मागे लग्न कर म्हणून तगादा लावला होता. पण, रत्नमालापासून सुटकारा मिळविण्याचा मार्ग त्याला सापडत नव्हता. एकीकडे राजश्रीचा लग्नासाठी तगादा, तर दुसरीकडे या प्रेमसंबंधाच्या संशयावरून शरद आणि रत्नमाला यांच्यातील भांडणामुळे शरदही वैतागला होता.

रत्नमालाचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मात्र सगळा उलगडा झाला आणि पोलिसांनी शरदला त्याच्या घरातून उचलले. कारण अपघातापूर्वी रत्नमालाचा गळा आवळण्यात आल्याचा अहवालात स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता. सुरुवातीला शरदनेही झोपेचे सोंग घेर्‍याचा प्रयत्न केला; पण पोलिस ठाण्यात राजश्रीला आणि शवविच्छेदन अहवाल बघताच त्याने काय ओळखायचे ते ओळखले आणि आपल्या पापाचा घडा ओतायला सुरुवात केली. तो म्हणाला, साहेब मोटारसायकलचा अपघात घडवून आणून मला रत्नमालाला दरीत पाडायचे होते; पण ती नेमकी उलट्या बाजूला पडली. तिला फार लागले होते, ती जखमांनी तळमळत होती; पण जिवंत होती. त्यामुळे मीच तिच्या साडीने तिचा गळा आवळला आणि ती मयत झाल्यावर तिला दरीत टाकून दिले. पण, आता सगळेच संपले आहे. सुखाने सुरू असलेल्या संसारात न रमता शरदने दुसर्‍या घरोब्याच्या हव्यासापोटी रत्नमालाचा खून केला. पण, रत्नमालाचे भूत त्याच्या मानगुटीवर बसलेच. दुसर्‍या घरोब्याची स्वप्ने रंगवणारा शरद थेट कारागृहात जाऊन पोहोचला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news