

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील टेकपोळे येथील टाकी वस्तीजवळ मंगळवारी (दि. 20) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत जनावरांचा गोठा जळून भस्मसात झाला, तर आगीवर नियंत्रण मिळविताना शेतकरी गंभीर जखमी झाला. गोठ्यातील जनावरे रानात चरायला गेल्याने सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. दामू नामदेव बामगुडे (वय 62) असे जखमी शेतकर्याचे नाव आहे. या आगीत जनावरांचा चारा, वर्षभराचे अन्नधान्य, शेती अवजारे आदी साहित्य जळून खाक झाले.
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, दामू बामगुडे हे जनावरांना रानात सोडून सकाळी गोठ्यात आले होते. चूल पेटवण्यासाठी त्यांनी कोळशाचा निखारा आणला होता. चूल पेटवताना आगीने पेट घेतला. लगतच्या गवताच्या पेंढ्यांना आग लागून मोठा भडका उडाला. काही क्षणातच गोठ्याने चौहोबाजूंनी पेट घेतला. बामगुडे हे झाडा-झुडपाच्या फांद्या घेऊन आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र, जोरदार वार्यामुळे आग भडकली आणि ते गंभीर जखमी झाले.
काही क्षणातच आगीने उग्र रूप धारण केले. टाकी धनगरवस्तीतील महिला व ग्रामस्थांनी घरातील पाण्याचे हांडे ओतून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, अर्ध्या तासातच संपूर्ण गोठा आगीत जळून भस्मसात झाला. ग्रामस्थांनी गंभीर जखमी बामगुडे यांना टेकपोळे गावातील घरी नेले. नुकसानग्रस्त शेतकरी बामगुडे यांना तातडीने नुकसानभरपाई देण्याचा मागणी माजी सरपंच दिनकर बामगुडे यांनी केली आहे.
आगीत जीवितहानी झाली नाही. मात्र, शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. त्याचा पंचनामा करण्याचे आदेश संबंधित तलाठ्याला देण्यात आले आहेत.
– राजश्री भोसले, नायब तहसीलदार, वेल्हे.
हेही वाचा