गोपाळवाडीला 4 कोटींच्या योजनेचा घाट : विहिरीची जागा अनिश्चित | पुढारी

गोपाळवाडीला 4 कोटींच्या योजनेचा घाट : विहिरीची जागा अनिश्चित

केडगाव : पुढारी वृत्तसेवा : दौंड तालुक्यातील गोपाळवाडी येथील 4 कोटी रुपयांची जलजीवन मिशनची नळ पाणीपुरवठा योजना उभारण्याची मुदत संपली आहे. परंतु, ठेकेदाराने या योजनेच्या कामासाठी अद्याप एक कुदळही मारलेली नसल्याचे दिसून येते आहे. जलजीवन मिशनच्या भानगडबाज अधिकार्‍यांनी योजनेतील विहिरीची जागा ताब्यात न घेताच योजनेला मंजुरी दिली आहे.गेले वर्षभर या योजनेच्या विहिरीसाठीच्या जागेचा प्रश्नच मिटलेला नसून साडेचार कोटींची योजना नक्की कशाच्या आधारावर करण्यात आली, हे समजण्यास काही मार्ग राहिलेला नाही.

दौंड शहरालगत असलेल्या गोपाळवाडीसाठी पूर्वी एक योजना करण्यात आलेली आहे. विहीर खोदून गावकर्‍यांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आलेली आहे. पाच रुपयांमध्ये गावकर्‍यांना वीस लिटर शुद्ध पाणी सध्या अतिशय व्यवस्थितपणे मिळत आहे,असे असतानाही नागरिकांना आणखी एक चार कोटी रुपयांची योजना देण्याचा अट्टहास जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने, दौंड तालुका पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाने का केला आहे? योजनेची पुरेपूर माहिती मिळवण्याआधीच मंजुरीसाठी फसव्या कागदपत्रांची जुळवाजुळव करीत सरकारच्या डोळ्यात माती फेकत योजनेसाठी जवळपास चार कोटी रुपयांची मंजुरी मिळवून ठेकेदाराला काम देईपर्यंत मजल करणार्‍या या विभागांनी योजनेला पाणी कुठून आणायचे हाच प्रश्न गांभीर्याने न घेतल्याने तो अद्याप
सुटलेला नाही.

वडगाव दरेकर याठिकाणीसुद्धा ही योजना मंजूर करण्यासाठी शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर जुजबी एका व्यक्तीचा विहिरीसाठी जागा म्हणून नोंद करून या योजनेच्या कागदपत्रांमध्ये घालून योजना मंजूर करून आणली होती आणि नंतर या योजनेतील विहिरीची जागाच अडचणीत आल्याचे चित्र दै. ’पुढारी’ने उघड केले आहे. वडगाव दरेकर आणि गोपाळवाडी दोन्ही गावांचा एकच प्रश्न जरी असला तरी वडगाव दरेकरच्या काही भागांमध्ये ठेकेदाराने वाहिनी काढून काम करण्याचे नाटक केलेले आहे.

कामाला सुरुवातच नाही

गोपाळवाडीतील योजना सुरू करण्यासाठी 18 ऑगस्ट 2023 हा कालावधी दिला होता, ते काम 17 फेब—ुवारी 2024 रोजी संपवण्यासाठी मुदत होती. ठेकेदार म्हणून अनिल भीमराव जाधव काम करीत असून कामाची मुदत संपूनही कुठल्याच प्रकारचे काम झालेले नाही, अशी माहिती दै. ‘पुढारी’ला देताना त्यांनी सांगितले की, योजनेसाठी विहिरीला जागाच अद्याप उपलब्ध नसल्याने काम करण्यात आलेले नाही.

हेही वाचा

Back to top button