पदपथांना अनेक ठिकाणी अडचणींचा विळखा; अनेक ठिकाणी अतिक्रमण

पदपथांना अनेक ठिकाणी अडचणींचा विळखा; अनेक ठिकाणी अतिक्रमण

पुणे : सोलापूर महामार्गावर मगरपट्टा चौक ते रामटेकडी पूल या ठिकाणी पदपथांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने पादचार्‍यांना चालताना तारेवरची कसरत करावी लागते. तसेच, या रस्त्यावर अनेक ठिकाणी पदपथ फोडून वाहनांसाठी रस्ता तयार केल्याने पादचार्‍यांना रस्त्यावरूनच मार्गक्रमण करावे लागत आहे. ज्या ठिकाणी पदपथ अस्तित्वात आहे त्याठिकाणी सर्रास दुचाकी वाहनांचे पार्किंग होत असल्याचे दैनिक 'पुढारी'ने केलेल्या पाहणीत समोर आले आहे.

महापालिकेने शहरातील बारा मीटरपेक्षा अधिक रुंदीच्या 356 रस्त्याचा 'वॉकिंग सर्व्हे' करून त्या रस्त्यांच्या सद्यःस्थितीचा अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार रस्त्याची दुरुस्ती केली जाणार आहे. महापालिकेच्या पाहणीनुसार व अहवालानंतर दैनिक 'पुढारी'ने सोलापूर महामार्गावरील रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीनुसार या रस्त्यावरील पदपथांची दयनीय अवस्था झाली असून, पादचार्‍यांचा विचारच करण्यात आलेला नाही.

पदपथच केले गायब

रामटेकडीकडून मगरपट्टा चौकाकडे येताना वैदूवाडी येथील पादचारी मार्ग फोडण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी रस्त्याची रुंदी वाढवून वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर मगरपट्टा चौकाकडून रामटेकडीकडे जाताना वैदूवाडी चौकाच्या आधीही पदपथ फोडला आहे. त्यामुळे पादचार्‍यांना आपला जीव मुठीत ठेवून मार्गक्रमण करावे लागत आहे.

रस्त्यावर अशास्त्रीय गतिरोधक

सोलापूर महामार्गावर मगरपट्टा चौकाकडून वैदूवाडीकडे जाताना मोठा गतिरोधक आहे. या गतिरोधकाची उंची व रुंदी दोन्ही जास्त असल्याने वाहने आदळतात. शिवाय या गतिरोधकांवर पांढरे पट्टेही नाहीत, त्यामुळे वेग जास्त असलेल्या वाहनांना दिसत नाहीत. हे अशास्त्रीय गतिरोधक काढावेत किंवा त्याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

पादचारी सिग्नलचा पत्ताच नाही

सोलापूर महामार्गावर मगरपट्टा चौक ते रामटेकडी असे दोन चौक आहेत. मात्र, यापैकी एकाही चौकात पादचार्‍यांना रस्ता ओलांडण्यासाठी सिग्नल यंत्रणेत स्वतंत्र वेळ देण्यात आलेली नाही. ज्या ठिकाणी दुभाजक ब्रेक करून रस्ता ओलांडण्याची व्यवस्था केली आहे, तेथे सिग्नलची व्यवस्थाच नाही. वैदूवाडी चौकामध्येही कुठूनही नागरिक रस्ता ओंलाडत असतात.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news