Anil Sable Drug Case : दुचाकी ते मर्सिडीज : साबळेचा प्रवास | पुढारी

Anil Sable Drug Case : दुचाकी ते मर्सिडीज : साबळेचा प्रवास

पुणे/कुरकुंभ : पुढारी वृत्तसेवा : पुण्यातील ससून रुग्णालयातून चालणारे ड्रगरॅकेट व कारखाने उद्ध्वस्त केल्यानंतर ड्रगतस्कर ललित पाटील हे नाव समोर आले. ललित पाटील प्रकरणाचा तपास संपतो न संपतो तोच पुणे पोलिसांच्या हाती कुरकुंभमधील ड्रगनिर्मिती करणारा कारखाना लागला आहे अन् त्याबरोबर तो चालविणारा अनिल साबळेही. या साबळेचा दुचाकी ते मर्सिडीज असा प्रवास थक्क करणारा आहे. कंपनीचा मालक अनिल साबळे श्रीगोंदा तालुक्यातील असून, साधारणपणे 15 वर्षांपासून कुरकुंभ एमआयडीसीमध्ये अर्थकेम लॅबोरेटरीज ही कंपनी चालवतो.

साबळे हा सुरुवातीला कुरकुंभ एमआयडीसीत दुचाकीवरून ये-जा करायचा. आता त्याच्याकडे अतिशय महागाड्या चारचाकी गाड्या आहेत. मागील 4 ते 5 वर्षांत दुचाकी ते मर्सिडीज हा साबळेचा थक्क करणारा प्रवास अखेर ड्रगच्या माध्यमातून झाल्याचा अंदाज पोलिससूत्रांनी वर्तविला आहे. औद्योगिक क्षेत्रातील (एमआयडीसी) अर्थकेम लॅबोरेटरीज, प्लॉट नंबर ए 70, या कंपनीवर पुणे पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली. या कंपनीतून तब्बल 1 हजार 400 कोटी रुपयांच्या 700 किलो मेफेड्रॉनचा (एमडी ड्रग) साठा जप्त करण्यात आला. मंगळवारी (दि. 20) हा प्रकार उघडकीस आला.

सुमारे 13 तास ही कारवाई सुरू होती. ड्रगनिर्मिती तील साबळे हा मोठा मासा पोलिसांच्या हाती लागला असला तरी त्याने आतापर्यंत कोणासोबत ड्रगचे डिलिग केले? त्यातून किती माया कमवली? त्याचे कोण साथीदार आहेत? त्याच्यावर कोणाचा वरदहस्त आहे? ललित पाटीलसारखा मोठा ड्रगतस्कर पुणे पोलिसांच्या हाती लागला असताना त्याला मेफेड्रॉन निर्मिती करताना भीती कशी वाटली नाही? याचा सर्व लेखाजोखा पोलिस तपासातून पुढे येईल, असे सूत्रांनी सांगितले.

एमआयडीसी की ड्रगचे आगार

यापूर्वी येथील समर्थ लॅबोरेटरीज आणि सुजलाम केमिकल्स या दोन कंपन्यांवर कारवाई करून ड्रगसाठा जप्त केला होता. अर्थकेम कंपनीवरील कारवाई ही तिसरी घटना आहे. समर्थ आणि सुजलाम या कंपन्यांमध्ये पुन्हा उत्पादन प्रक्रिया सुरू असून, सध्या तिथे नेमके कुठले उत्पादन घेतले जाते, याबाबत देखील तपास करणे गरजेचे आहे. कुरकुंभ एमआयडीसीची ओळख आता ड्रगचे आगार म्हणून निर्माण झाली आहे. त्यातच या कंपनीतील ड्रग थेट दिल्लीत पोहचल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी असा टाकला छापा

पुणे पोलिस पथकाच्या आठ ते दहा वाहनांचा ताफा मंगळवारी (दि. 20) पहाटे तीन वाजता कंपनीजवळ दाखल झाला. या पथकाने कंपनीवर छापा टाकून कारवाई केली. मंगळवारी पहाटे 3 ते दुपारी 4 वाजेपर्यंत कारवाई सुरू होती. घटनास्थळावरून पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला असून, तो माल एका मालवाहू वाहनातून पोलिस बंदोबस्तात रासायनिक प्रयोगशाळेत (एफएसएल) पुढील कारवाईसाठी रवाना करण्यात आला आहे.

कंपन्यांकडून नियम धाब्यावर

कुरकुंभ औद्योगिक क्षेत्र केमिकल झोन असून, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केमिकल कंपन्यांचे जाळे पसरले आहे. बहुतांश कंपन्या शासनाच्या नियम-अटी व शर्तींना सर्रास धाब्यावर बसवून काम करतात. यात प्रामुख्याने लहान कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांमध्ये कुठले उत्पादन घेतले जाते, याबाबत माहिती दिली जात नाही. तसे फलकही कंपन्यांसमोर लावले जात नाहीत. अर्थकेम कंपनीबाबत देखील अशीच परिस्थिती असून, कंपनीतील उत्पादनाची सखोल माहिती कंपनीसमोर लावलेली नाही. मूळ उत्पादन सोडून या कंपनीत दुसराच उद्योग सुरू होता.

कोठेही कारखाना उभारा, वाट्टेल ते उत्पादन घ्या…! कोणत्याच सरकारी यंत्रणेचे नाही नियंत्रण

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) औद्योगिक वसाहतीत भूखंड घ्या, कारखाना उभारा आणि वाट्टेल ते उत्पादन घ्या, अशी स्थिती निर्माण झाली आहे, असे वाटण्यासारखी सध्याची परिस्थिती आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) औद्योगिक वसाहतीत उद्योग उभारायचा असल्यास अनेक यंत्रणांकडून परवानग्या घ्याव्या लागतात.
मंगळवारी ड्रगनिर्मिती कारखान्यावर छापा पडल्यानंतर कारखाना निरीक्षकांशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, ही कंपनी बेकायदेशीरपणे सुरू आहे, असा खटला 29 मार्च 2022 रोजी न्यायालयात दाखल केला आहे.

कंपनी तातडीने बंद करण्याचा अधिकार आमच्याकडे नाही. कारखान्यातील सुरक्षायंत्रणा तपासण्याचे त्यांच्या विभागाचे काम आहे, उत्पादन तपासण्याचे नाही. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकार्‍यांनीही उत्पादनाशी त्यांचा संबंध नसल्याचे सांगितले.
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी नितीन शिंदे यांनी तर आठ फोन केल्यानंतर देखील ते घेतले नाहीत. 4 वाजून 31 मिनिटांनी अखेरचा फोन केल्यानंतर 7 वाजून 15 मिनिटांनी त्यांचा फोन आला.

एखादा कारखाना रासायनिक पदार्थनिर्मिती करीत असेल तर प्रदूषण नियंत्रणाच्या द़ृष्टीने आपण काय पाहणी करता? कोणती माहिती घेता? यासंबंधी कारखान्याची तशी माहिती घेतली होती का? असे विचारले असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. एवढेच नाही तर सगळीच माहिती फोनद्वारे पाहिजे का? ऑफिसला येऊन माहिती घ्या, असे सांगून फोन ठेवला. अन्न व औषध निरीक्षकांनी त्यांच्याकडे नोंद असलेल्या कंपन्यांची ते तपासणी करतात. इतर कंपन्या कारखाना निरीक्षकांच्या अखत्यारीत येतात, असे सांगितले. थोडक्यात, या सर्व यंत्रणांनी उत्पादन तपासणी करण्याची जबाबदारी कोणाची आहे? हे मात्र सांगितले नाही.

हेही वाचा

Back to top button