पुण्यातील अपहरण केलेला चिमुरडा सातार्‍यात सापडला | पुढारी

पुण्यातील अपहरण केलेला चिमुरडा सातार्‍यात सापडला

सातारा; पुढारी वृत्तसेवा : पुण्यातून विश्वराज भिलारे या चिमुरड्याचे काही खंडणीखोरांनी अपहरण केले होते. तपासामध्ये अपहरणकर्त्यांनी वापरलेली कार व त्यांचा मोबाईल ट्रेस झाला. या माध्यमातून पोलिसांना विश्वराज हा सातार्‍यात असल्याचे समोर आले. त्यानुसार पुणे व सातारा पोलिसांनी एकत्र शोधमोहीम राबवली. विश्वराजच्या शोधासाठी पोलिस रात्रभर पाटेश्वरच्या डोंगरात होते. पहाटे विश्वराज सापडला मात्र खंडणीखोर पसार झाले. या घटनेमुळे अपहरणनाट्याचा थरार निर्माण झाला.

चिमुरडा विश्वराजच्या अपहरणानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही व कात्रज येथील परिसर पिंजून काढला. सुमारे तीन तासानंतर एकएक क्लू पुणे पोलिसांच्या हाती लागत गेला. सुरुवातीला कारबाबतची माहिती समोर आली. मात्र कार भाड्याने घेतली असल्याने पोलिसांसमोर नेमके अपहरणकर्ते कोण असा सवाल उपस्थित झाला. कार ज्या टोल नाक्यांवरुन पास झाली असेल त्याची माहिती घेण्यास सुरुवात झाली. अशातच कात्रज परिसरात विश्वराज याच्या परिसरात राहणार्‍या संशयित अपहरणकर्त्यांची माहिती मिळाली. त्यातील एकाचा मोबाईल क्रमांक मिळाला. मात्र, अपहरणकर्त्यांनी मोबाईल बंद ठेवले होते. यामुळे पोलिस पुन्हा नाउमेद झाले. मात्र, रात्री 10 वाजता अपहरणकर्त्यांचा फोन सुरु झाल्याचा सिग्नल मिळताच पुणे पोलिस तपासाला लागले. अपहरणकर्त्यांचे लोकेशन सातारानजीक आल्याने पुणे पोलिसांनी सातारा तालुका पोलिस, स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाला त्याची माहिती दिली. त्यानंतर सातारा पोलिसही तपासाला लागले. मध्यरात्री 12.30 वाजता सातारा पोलिसांनी पथक तयार झाले. सातार्‍यातील लोकेशन दाखवल्यानंतर पाटेश्वर ता. सातारा येथील डोंगर परिसरात जमले व शोध मोहिम राबवली. तोपर्यंत पुणे पोलिसांचे एक पथकही पाटेश्वरमध्ये दाखल झाले.

मध्यरात्री चिमुरड्याच्या जीवाला धोका पोहोचू नये, यासाठी पोलिसांनी गतीने शोध घेण्यास सुरूवात केली. पाटेश्वर ते कास रस्ता या दरम्यान पोलिसांनी शोधाशोध केली. त्यावेळी ज्या कारमधून बालकाचे अपहरण झाले होते ती कार पोलिसांना सापडली. मात्र, त्यामध्ये कोणीही नव्हते. पोलिसांनी डोंगरदर्‍यात पायी शोधण्यास सुरुवात केली. पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास विश्वराज पोलिसांच्या समोर आला. तो सुखरुप असल्याचे पाहून पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र अपहरणकर्ते तेथे नव्हते. विश्वराजने दिलेल्या माहितीनुसार अपहरणकर्ते पायी डोंगरामध्ये पसार झाले. सातारा पोलिसांनी दुपारपर्यंत शोधमोहिम सुरु ठेवली. मात्र खंडणीखोरांना शोधण्यात यश आले नाही. दरम्यान, खंडणीखोर हे सातारा तालुक्यातील असल्याचे समोर आले आहे.

Back to top button